मद्य परवान्यासाठी अद्याप एकही अर्ज नाही

नाताळ आणि नववर्षांच्या स्वागताच्या पार्टीसाठी एक दिवसाचा परवाना अनिवार्य असताना तो न घेता पार्टी करण्याचे प्रमाण वाढत आहे. नाताळ आणि ३१ डिसेंबर जवळ आले तरी अद्याप पालघर जिल्ह्यात परवान्यासाठी एकही अर्ज आलेला नाही. वसई-विरार शहरात अशा पाटर्य़ाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथकांची स्थापना केली आहे.

वसई-विरार शहरात नाताळ आणि नववर्षांनिमित्त जागोजागी पाटर्य़ाचे आयोजन करण्यात येत असते. अशी पार्टी करायची असेल तर एक दिवसाचा परवाना काढावा लागतो. इमारतीच्या गच्चीवर किंवा घरात जरी अशी पार्टी करायची असेल तरीही परवाना आवश्यक आहे. या पार्टीत जर १०० लोक येणार असतील तर १० हजार रुपये आणि १००हून अधिक लोक येणार असतील तर १५ हजार रुपये भरून परवाना घ्यावा लागतो. पालघरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर, वसई आणि डहाणू हे तीन विभाग आहेत, मात्र अद्याप एकही परवाना कुठल्याही पार्टी आयोजकाने घेतलेला नसल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यात केवळ एक दिवसाच्या पार्टीसाठी केवळ १६ परवानग्या देण्यात आल्या होत्या. परवानग्या न घेता पार्टी करण्याकडे कल वाढत चाललेला आहे. यावर कारवाई करण्यासाठी या वर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष भरारी पथकाची स्थापना केली आहे. परवाना न घेता केलेली प्रत्येक पार्टी बेकायदा असते. लोकांचे परवाने घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यासाठी या वर्षी खास पथके स्थापन केली आहेत. वसई-विरार शहरात अशा पाटर्य़ाचे प्रमाण जास्त असते, तिथे ही कारवाई केली जाईल, असे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. एम. लेंगरे यांनी सांगितले.

रिसॉर्टवर कारवाई होणार का?

नाताळ आणि नववर्षांच्या स्वागतासाठी पर्यटक वसई परिसरातील रिसॉर्ट्समध्ये येत असतात. त्या ठिकाणीही मोठय़ा पाटर्य़ा आयोजित केल्या जातात. अशा ठिकाणी सर्रास बेकायदा मद्यविक्री होत असते. मागील वर्षी एकाही रिसॉर्टवर कारवाई करण्यात आलेली नव्हती. जर कुठल्या रिसॉर्टमध्ये बेकायदा मद्यविक्री होत असेल, तर त्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे अधीक्षक व्ही. एम. लेंगरे यांनी सांगितले.