ठाणेकरांना यंदाच्या आर्थिक वर्षांतील कर वेळेत भरता यावा यासाठी महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये आणि उपप्रभाग कार्यालये ३१ ऑक्टोबपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे शहरातील नागरिकांना शनिवारी सुटीच्या दिवशी पालिकेत कर भरणे शक्य होणार आहे.

यंदाच्या वर्षांचा मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची एकत्रित रक्कम ३१ ऑक्टोबपर्यंत भरल्यास ठाणेकरांना दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये अग्निशमन कर वगळून तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा ठाणेकरांना जास्तीत जास्त फायदा व्हावा. तसेच त्यांना मुदतीत मालमत्ता कर भरणे शक्य व्हावे, यासाठी सर्व कर संकलन केंद्रे ३१ ऑक्टोबपर्यंत प्रत्येक शनिवारी सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. यामध्ये ३० ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद या सार्वजनिक सुटीच्या दिवशीही ही केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यासोबतच नागरिकांना महापालिकेच्या http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.