ठाणे महापालिकेची नवी संकल्पना

ठाणे : टाळेबंदी शिथिलीकरणानंतर शहरातील मालमत्ता करवसुलीवर भर देणाऱ्या महापालिका प्रशासनाने कराचा भरणा करण्यासाठी ‘मोबाइल व्हॅन’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या व्हॅनद्वारे शहरात करवसुली सुरू करण्यात आली असून यामुळे ठाणेकरांना आता घराजवळच कराचा भरणा करणे शक्य होणार आहे.

या व्हॅनमध्ये मालमत्ता कर रोखीने, धनादेश, धनाकर्ष अथवा डेबिट कार्ड, एटीएम कार्डने भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कराचे देयक आणि कर भरल्याची पावती देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीची अंमलबजावणी करण्याच्या कामात महापालिका यंत्रणा व्यग्र होती. त्याचा परिणाम मालमत्ता करवसुलीवर झाला. अखेर जून महिन्याच्या मध्यावधीनंतर महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीवर विशेष भर देण्यास सुरुवात केली असून त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत आता कोटय़वधी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. या कराच्या वसुलीसाठी महापालिकेकडून सुटीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवली जात असून त्याचबरोबर मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी विविध सवलती जाहीर केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता ठाणेकरांना कराचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महापालिकेने मोबाइल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही व्हॅन पूर्णपणे रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमाणकानुसार आहे. यामध्ये संगणक, प्रिंटर आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा, ऑपरेटर, चालक आणि सुरक्षारक्षकही देण्यात आला आहे. याचा सर्व खर्च बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.

मालमत्ता कर संकलन करण्यासाठी सार्वजनिक सुटींच्या दिवशी किंवा इतर दिवशी गृहसंकुलांमध्ये शिबिरे राबविण्यात येणार असून तिथे करवसुलीसाठी मोबाइल व्हॅनचा उपयोग केला जाणार आहे, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.

घराजवळच कर भरण्याची सुविधा

एखाद्या गृहनिर्माण संस्थेने मालमत्ता कर भरण्यासाठी व्हॅनची मागणी केली तर हे व्हॅन संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या संकुलात पाठविण्यात येत आहे. करदात्यांनी मालमत्ता कर देयकाची मागणी केली तर त्यांना या व्हॅनद्वारे देयकही देण्यात येत आहे. कर भरल्यानंतर पावती देण्याची व्यवस्था व्हॅनमध्ये करण्यात आली आहे.

चांगला प्रतिसाद

महापालिका आयुक्त डॉ. विपिन  शर्मा यांच्या संकल्पनेतून मोबाइल व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. मालमत्ता कर विभागाच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसांपासून या व्हॅनद्वारे करवसुली सुरू करण्यात आली आहे. शहरातील करदात्यांना त्यांच्या घराजवळच कर भरण्याची सुविधा मिळत असल्यामुळे या व्हॅनच्या उपक्रमाला ठाणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.