सोमवारपासून अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका

ठाणे शहरातील पदपथ, बंदिस्त नाले यांवर जागा अडवून बेकायदा बांधकामे करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी महापालिकेने उशिरा का होईना पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून येत्या सोमवारपासून यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी रात्री उशिरा घेतलेल्या अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बांधकामे हटवण्यासाठी ४ ऑक्टोबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

ठाण्यासह कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरांतील नाले आणि पदपथांवर करण्यात आलेली बांधकामे हटवण्याचे आदेश जयस्वाल यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र, पावसाळय़ात या कारवाईवर र्निबध आले. आता पावसाळा सरल्यामुळे जयस्वाल यांनी बुधवारी तातडीची बैठक घेऊन ही कारवाई वेगाने करण्याच्या सूचना अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. ही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना तीन दिवसांची नोटीस देण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. त्यानुसार येत्या ४ ऑक्टोबपर्यंत जी बांधकामे हटवली जाणार नाहीत ती ताबडतोब हटवावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच या कारवाई मोहिमेचा खर्चही बांधकाम करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, वारंवार आदेश देऊनही सॅटिस तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील फेरीवाल्यांविरोधात योग्य प्रकारे कारवाई होत नसल्याने आयुक्तांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आठवडा बाजारांवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेशही अतिक्रमणविरोधी पथकाकडून धाब्यावर बसविले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर बुधवारच्या बैठकीत पुन्हा एकदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या.