शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टय़ा लागल्याने नागरिकांच्या गावी जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. तसेच लग्नसराईचा हंगामही सध्या जोरात आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ-बदलापूर परिसरात सोनसाखळी चोरी आणि घरफोडय़ांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत बदलापुरात दोन सोनसाखळी चोरी आणि दोन घरफोडय़ांच्या घटना घडल्या आहेत. विशेष बाब म्हणजे सोनसाखळी चोरीच्या दोन्ही घटना जेमतेम २० मिनिटांच्या फरकाने घडल्या आहेत.
नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणाऱ्या मीना कानोडकर बदलापुरात लग्न समारंभासाठी आल्या होत्या. त्या नगरपालिकेलगतच्या रस्त्याने जात असताना रात्री आठ वाजता समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मंगळसूत्र आणि बोरमाळ खेचून नेली. कात्रप परिसरातही छाया मेस्त्री आपले दुकान बंद करू निघाल्या होत्या. गणेश घाट येथून जात असताना दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील गंठन आणि मंगळसूत्र जबरीने खेचून नेले. एकाच दिवशी एक लाख ४० हजार रुपयांची सोनसाखळी चोरी झाल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून थंडावलेल्या घरफोडीच्या घटनाही आता सुरू झाल्या असून सोनसाखळी चोरीसोबतच बदलापुरात झालेल्या दोन घरफोडय़ांमुळेही गावी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बदलापूर पश्चिमेतील दत्त चौक परिसरात राहणाऱ्या राजेश वानखेडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने, ११ हजार रोख रक्कम आणि दोन मोबाइल असा ६४ हजारांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लंपास केला. तर दुसरीकडे जोत्स्ना निळे यांच्या घरातून सुमारे ८० हजारांचे दागिने चोरटय़ांनी पळवले. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शाळा महाविद्यालयांना सुट्टय़ा लागल्या आहेत. तसेच लग्न समारंभही मोठय़ा प्रमाणावर सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेकदा नागरिक बाहेर परगावी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरी आणि घरफोडय़ांचे प्रमाण वाढते. रात्रीच्या वेळी होणाऱ्या घरफोडय़ांबाबत पोलिसांना कारणे देता येतात. मात्र भरदिवसा होणाऱ्या घरफोडय़ा रोखण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.

पोलिसांचे संख्याबळ अपुरे
फेब्रुवारी महिन्यातही बदलापूर आणि अंबरनाथ परिसरात घरफोडीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यावेळी चड्डी बनियान टोळी शहरात दाखल झाल्याच्या अफवा पसरत होत्या. त्यावेळी शहर पोलिसांकडे पुरेशी कुमक नसल्याचे समोर आले होते.