रायगड जिल्ह्य़ातील पेणमधील बाळगंगा धरणाच्या कामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणखी तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली आहे. त्यामध्ये तत्कालीन शाखा अभियंता विजय रघुनाथ कासट, एफ. ए. एन्टरप्रायझेस या फर्मचे भागीदार कंत्राटदार अबीद फतेमोहमंद खत्री आणि झाहीर फतेमोहमंद खत्री यांचा समावेश आहे. या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बाळगंगा धरण कामातील गैरव्यवहारप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात सुरुवातीला उपअभियंता राजेश रिठे आणि ठेकेदार निसार खत्री या दोघांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ आता विजय कासट, अबीद खत्री, झाहीर खत्री या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आकडा पाच इतका झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अटकेची कारवाई सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, निसार खत्री याच्या घरातील कागदपत्रांची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेण्यात आली असून त्यामध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे.