अटक विकासक वाघ याला पलायनास मदत केल्याचा ठपका

डोंबिवली : बका आणि सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला आरोपी विकासक जगदीश वाघ याच्या पलायनप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वाघ याच्यावर निगराणी ठेवण्याच्या जबाबदारीत हलगर्जी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलीस नाईक हेमंत राणे, पोलीस शिपाई सचिन वानखेडे, गिरीश शिर्के अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. सीकेपी, एनकेजीएसबी बँक आणि सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासक जगदीश वाघ याला पोलिसांनी गेल्या आठवडय़ात अटक केली होती. तो सात दिवस पोलीस कोठडीत होता. सोमवारी कोठडीची मुदत संपणार होती. मात्र, त्याआधीच रविवारी सकाळी त्याने पोलीस ठाण्यातून पलायन केले होते. त्याने डोंबिवलीतून टॅक्सी करून मुंबई विमानतळ गाठले. तेथून तो गोव्याला पळणार होता. पोलिसांनी त्यांना विमानतळावरून अटक केली. आरोपी वाघ पोलीस कोठडीत असताना त्याच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पोलीस नाईक हेमंत राणे, पोलीस शिपाई सचिन वानखेडे, गिरीश शिर्के या तिघांवर होती. त्यामुळे हलगर्जीपणाचा ठपका ठेवत अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या आदेशावरून उपायुक्त पानसरे यांनी तिघांना सोमवारी रात्री निलंबित केले. तसेच कोठडीतून पळून गेला म्हणून वाघ याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक झालेल्यांना आवाहन

जगदीश वाघ याने आपली ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे, अशी लेखी तक्रार डोंबिवलीतील एका रहिवाशाने रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. डॉ. प्रकाश देशमुख यांनीही अशाच प्रकारची तक्रार केली आहे. अशा प्रकारे अन्य रहिवाशांची वाघ यांनी फसवणूक केली असेल तर त्यांनी कागदपत्र पुराव्यासह रामनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी केले आहे.

सीसीटीव्ही तपासणी

वाघ पोलीस कोठडीत होता, त्यावेळचे सीसीटीव्हीमधील चित्रीकरण अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी मागितले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही, डीव्हीआर त्यावेळी बंद होता असे सांगितले. मग हे कोणी बंद केले. बंद कधीपासून होते. बंद होते तर त्याची दुरुस्ती का गेली नाही, असे प्रश्न पोलीस चौकशीतून पुढे आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे कोठडीबाहेर २४ तास सीसीटीव्ही सुरू असले पाहिजेत असा नियम आहे. सीसीटीव्ही सुरू करण्याची कार्यवाही का केली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.