कोपरीमधील बस थांबा उद्ध्वस्त; अग्निशमन दलाच्या पथकाने झाड हटवले
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील कोपरी बस थांब्यावर मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाड कोसळले. त्यामुळे बस थांबा उद्ध्वस्त झाला असून तेथे उभ्या असलेल्या प्रवाशांनी पळ काढल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. आपत्कालीन विभागाचे पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन हे झाड बाजूला हटवले. या अपघातामुळे ठाणे परिवहन विभागाच्या बस थांब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
ठाणे पूर्वेतील कोपरी येथे महापालिका परिवहन विभागाचा बस थांबा असून तेथून ठाण्यातील विविध भागांमध्ये परिवहन विभागाच्या बस धावतात. त्याचप्रमाणे नवी मुंबई आणि मुंबईच्या परिवहन विभागाच्या बस गाडय़ांना या भागामध्ये थांबा देण्यात आला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरे, नवी मुंबईचा परिसर आणि ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या मार्गावर दिवसभरामध्ये हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी इथे मोठी गर्दी असते. मंगळवारी सकाळच्या वेळी या भागातील झाड अचानक तेथील बस थांब्यावर कोसळले. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने तेथे प्रवाशांची तुरळक गर्दी होती. झाड कोसळत असल्याचे लक्षात येताच बस थांब्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांनी तेथून तात्काळ पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन हे झाड दूर हटवले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.