नैसर्गिक नाले नष्ट होण्याच्या मार्गावर; तीन पाडे पाण्याखाली जाण्याची भीती

मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील घोडबंदर मार्गालगत असलेल्या तीन आदिवासी पाडय़ांना बेकायदा मातीभरावाचा त्रास सहन करवा लागत असल्याचे आढळून आले आहे. या पाडय़ांलगत असलेल्या नैसर्गिक नाल्यांत मोठय़ा प्रमाणात मातीभराव झाल्यामुळे पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबण्याची भीती निर्माण झाली आहे.

घोडबंदर गावालगत असलेल्या वेलकरी पाडा, पाटील पाडा आणि वाडय़ाचा पाडा या तीन आदिवासी पाडय़ांत अनेक वर्षांपासून सुमारे १५० कुटंबीय वास्तव्य करत आहेत. परंतु या पाडय़ांना लागूनच असलेल्या संपूर्ण परिसरात मोठय़ा प्रमाणात मातीभराव करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या भरावामुळे  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहून येणारे नाले तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने पावसाळय़ात पाणी साचू शकते. या पाडय़ांजवळूनच लक्ष्मी नदीही वाहत आहे. त्यामुळे पाण्याला प्रवाह न मिळताच ते पाणी आदिवासी पाडय़ात शिरण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षीही या पाडय़ात पूरस्थिती निर्माण झाली असून चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचले होते. या घटनेची गावकऱ्यांकडून लेखी स्वरूपात तक्रारही करण्यात आली होती. या पाडय़ांलगत तीनही बाजूस मोठय़ा प्रमाणात मातीभराव सुरू आल्यामुळे या वर्षी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची भीती या आदिवासी पाडय़ातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच या अनधिकृत बेकायदा मातीभरावाविरोधात प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या पूर्वी करण्यात आलेल्या मातीभरावांचे पंचनामे तयार करून शासनाला पाठवण्यात आले आहेत. – अभिजीत बोडके, तलाठी

या परिसरात आम्ही १९९५मध्ये साली राहायला आलो. परंतु गेल्या काही वर्षांत या परिसरात मातीभराव होत असून स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून या भरावाविरुद्ध मी  न्यायालयात गेलो आहे.

– अजय पाठक, स्थानीक रहिवासी