News Flash

नोटाबंदीमुळे मुरबाडमध्ये आदिवासींची परवड

वीटभट्टीवर, दुसऱ्यांच्या शेतावर राबून किंवा रानमेवा विकून येथील आदिवासी उदरनिर्वाह करतात.

मुरबाडमधील आदिवासींनाही नोटाबंदीचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा सहकारी बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून देण्यावर र्निबध असल्याने आणि बहुतांश आदिवासींची खाती याच बँकांत असल्याने त्यांची परवड सुरू आहे. आदिवासींना जुन्या नोटा बदलण्यासाठी १० ते १५ किलोमीटरवरील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जावे लागत आहे. अनेकांची बॅंक खातीच नसल्याचे दैनंदिन खर्चाची तोंडमिळवणी करताना तारेवरची कसरत सुरू आहे.

या भागातील बहुतांश ठाकर आणि कातकरी आदिवासींना जिल्हा सहकारी बॅंकेचा आधार आहे. परंतु, या ठिकाणी नोटा बदलणे शक्य नसल्याने त्यांना दूरवरच्या राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये नोटा बदलून घेण्याशिवाय पर्याय नाही. ज्यांचे खाते नाही त्यांना नोटा बदलून देण्यास बँका नकार देत असल्याने त्यांची अधिकच अडचण झाली आहे. हातात खर्चाला पुरेसे पैसे नसल्याने दैनंदिन खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. वीटभट्टीवर, दुसऱ्यांच्या शेतावर राबून किंवा रानमेवा विकून येथील आदिवासी उदरनिर्वाह करतात.

अनेक आदिवासी महिलांचे बॅंकेत खातेच नसल्यामुळे त्या बॅकेत खाती उघडय़ासाठी कर्मचाऱ्यांकडे विनवणी करीत आहेत. मात्र, नोटा बदलण्यासाठी ओघ वाढल्याने कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ नाही. या भागातील कातकरी समाज वीटभट्टय़ांवर काम करतो. त्यामुळे कामाची उचल त्यांना वर्षभरापूर्वीच मिळते. वीटभट्टी मालकाकडून मिळालेल्या उचलीत ५००च्या नोटा असतात. त्यामुळे, कष्टाचे पैसे आम्हाला मिळतील की नाही अशी भीती आदिवासींच्या मनात निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा सावकार उचलत आहेत. बँकेतून पैसे मिळत नसल्याने सावकारांकडून चढया व्याजदराने कर्ज घेण्याशिवाय अनेक कुटुंबांकडे पर्याय राहिलेला नाही, असे श्रमिक मुक्ती संघटनेचे दशरथ वाघ यांनी सांगितले.

धसई गावामध्ये राहणारी चमेली वाघ ही मुलगी कामा रुग्णालयात नर्सिगला आहे. वेगवेगळ्या संस्थेकडून तिला महिन्याच्या खर्चासाठी १५०० रुपये मिळतात. मात्र त्यातील एक नोट ५०० आणि दुसरी १००० ची असल्यामुळे चमेलीची अडचण झाली आहे. तिच्या काकांनी कल्याणमध्ये शिकणाऱ्या मुलाकरवी तिला पैशाची मदत केली.

धान्यपुरवठाही नाही

या महिन्यात बऱ्याच आदिवासी गावांतील रेशन दुकानात धान्य आलेले नाही, अशा तक्रारी मुरबाड व शहापूर तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थांकडून येत आहेत. कोटा मंजूर झाल्यावर रेशन दुकानदार जुन्या नोटा घेऊन भरणा करण्यास गेले तेव्हा मुरबाड व शहापूर येथील स्टेट बँकांनी त्या जमा करून घेण्यास नकार दिला आणि केवळ धनादेश स्वीकारला जाईल असे सांगितले. अशा परिस्थितीत गरीब आदिवासी, कातकरी , विधवा, वृद्धांनी जगायचे कसे, असा सवाल श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी केला.

आम्हाला सकाळी ७ वाजल्यापासून बॅंकेच्या रांगेत उभे रहावे लागते. संपूर्ण दिवस रांगेत उभे राहूनही जुन्या नोटा बदलून मिळतील, याची शाश्वती नाही. अनेकदा बॅंकेचे कर्मचारी दुसऱ्या दिवशी पैसे घेण्यासाठी बोलावतात. दुसऱ्या दिवशीही सकाळपासून रांगेत उभे राहावे लागत.

– किसन वाघ

संपूर्ण दिवस बॅंकेसमोर रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीत. आम्ही शिरगावातील बॅंकेसमोर रात्रीच जाऊन रांग लावतो.

रमेश गोवंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 2:23 am

Web Title: tribal people suffering major problem of note banned issue
Next Stories
1 पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश
2 छोटय़ा संमेलनांतून विचारांची देवाणघेवाण
3 अनधिकृत बांधकामांना वीजजोडणीचा मार्ग मोकळा
Just Now!
X