‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पात बाधित होणाऱ्या भिवंडीतील ग्रामस्थांना नोटिसा;  कालावधी वाढवून देण्याची मागणी

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प रखडण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, या प्रकल्पात बाधित होणाऱ्या भिवंडी तालुक्यातील भरोडी गावामधील ११ ग्रामस्थांना दोन दिवसांत घरे रिकामी करण्याच्या नोटिसा संबंधित कंपनीने पाठविल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले असून दोन दिवसांत नवीन घर शोधण्याचा पेच त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. शुक्रवार, ६ डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. मुदत वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यामुळे बुलेट ट्रेन रखडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. मुंबई-अहमदाबाद असा बुलेट ट्रेन प्रकल्प  आहे.  ट्रेन भिवंडी तालुक्यातील भरोडी या गावातून जाणार आहे. या गावातील २५ ते ३० घरांपैकी ११ घरे प्रकल्पात बाधित होणार आहेत. या घरमालकांना दोन महिन्यांपूर्वी ८० टक्के मोबदला देण्यात आला आहे. तसेच दोन महिन्यांत घरे रिकामी करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, या कामासाठी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे संबंधित कंपनीकडून तोंडी सांगण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थ निर्धास्त होते. दरम्यान, दोन महिन्यांची मुदत संपत आल्याने कंपनीने संबंधित ग्रामस्थांना नोटिसा पाठवून दोन दिवसांत घरे रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  दोन दिवसांत नवीन घर शोधण्याचा पेच त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.

प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी आठ ते दहा महिने लागतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे कोणीही विरोध केला नाही. मात्र, अचानक या नोटिसा आल्याने आता नवे घर शोधावे लागणार आहे. दोन दिवसांत नवे घर शोधणे शक्य नसल्याने सरकारने कालावधी वाढवून द्यावा.– विनोद पाटील-भरोडीकर, भरोडीगाव.