आयुक्तांकडून आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य, १७ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर

उल्हासनगर : कोणतीही करवाढ नसलेला, ४३० कोटी ४५ लाख रुपये जमेचा आणि ४३० कोटी २८ लाख रुपये खर्चाचा असा एकूण १७ लाख रुपये शिलकीचा काटकसरीचा अर्थसंकल्प उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी स्थायी समितीला नुकताच सादर केला. करोनाच्या संकटात व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगरात करवसुली थकल्याचा परिणाम थेट अर्थसंकल्पावर झाला आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प ४८३ कोटींवरून ४३९ कोटींवर आला आहे. अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असली तरी अनेक लेखाशीर्षांमध्ये काटकसर करत कपात करण्यात आली आहे.

व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहराला करोनाच्या काळात मोठा फटका बसल्यानंतर पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यानुसार उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी नुकतेच आर्थिक वर्ष २०२१-२२ चे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षांतील २८ कोटी ४० लाख रुपये शिल्लक समाविष्ट करून ४३० कोटी ४५ लाख रुपये उत्पन्न आणि ४३० कोटी २८ लाख रुपये खर्च असलेला असा १७ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला. करोनाच्या संकटानंतर उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी शहरातील आरोग्य व्यवस्थेसाठी भरीव तरतूद केली आहे. एड्स, क्षयरोग आणि इतर आजारांसाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दवाखाने आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी अर्थसंकल्पाच्या ५.१६ टक्के तरतूद करण्यात आली आहे. वचनबद्ध खर्चामध्ये वैद्यकीय आरोग्य लेखाशीर्षांत २२ कोटी २१ लाखांचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला आहे. शहरात पालिकेचे कोणतेही रुग्णालय नसल्याचा फटका करोना काळात बसला. त्यामुळे शहरात रुग्णालय उभारणीसाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. करोनाच्या संकटात सहव्याधी असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्यासाठी त्यांची नियमितपणे घरोघरी जाऊन तपासणी करण्यासाठी स्वतंत्र ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.काटकसर अशी पगार भत्त्यापोटी जाणारी रक्कम  १४३ कोटींवरून १४१ कोटींवर आली आहे. पाणी बिलापोटी एमआयडीसीचे पैसे देण्यावर आयुक्तांनी यंदा भर दिला आहे. शहर रोषणाईचा खर्च १२ कोटींवरून ९  कोटींवर, कचरा वाहतूक आणि जंतुनाशकांचा खर्च ३६ कोटींवरून १० कोटींवर आणण्यात आला आहे. उद्यान खर्च, रस्ते व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मल निस्सारण या लेखाशीर्षांखालील निधींमध्ये कपात करत काटकसर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अस्तित्वात नसलेल्या परिवहन सेवेवर गेल्या वर्षांत ३ कोटी ५५ लाखांची तरतूद होती. ही तरतूद आता ३० लाखांवर आणण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षणावर भर देण्यात आला आहे. रस्ते, पायाभूत सुविधा यांच्याकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. पालिकेचे रुग्णालय, करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमित कार्यक्रम, क्षयरोग, एड्स यांसाठी भरीव तरतूद केली आहे. – डॉ. राजा दयानिधी, आयुक्त, उल्हासनगर महापालिका