संचारबंदीमुळे आवक घटल्याने किमतीत ३० ते ४० रुपयांची वाढ

 

विरार : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे शहरात अत्यावश्यक सेवांचा मोठा तुटवडा निर्माण होत असून याचा फटका आता भाजीपाल्याला बसला आहे. बाजारातील भाज्यांची आवक घटल्याने भाव वधारले आहेत. जवळपास ३० ते ४० रुपयांनी भाज्यांची दरवाढ झाली आहे.

सरकारने संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांचा तुटवडा होणार नाही याची ग्वाही दिली होती, पण सध्या बाजारात भाजीपाला वाहतुकीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. याचा परिणाम भाज्यांच्या किमतीवर झाला आहे.

भाज्यांच्या किमतीत ४० ते ६० रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे संचारबंदीत नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत आहे, तर दुसरीकडे संचारबंदी असतानाही भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

नाशिक, वाशीच्या बाजारातून वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो. पण सध्या संचारबंदी असल्याने भाजीपाल्याची वाहतूक तुरळक आहे, तर गुजरातच्या सीमाबंदी असल्याने गुजरातवरून भाजीपाल्याची आवक बंद आहे. यामुळे ज्या भाज्या मिळतात आणि ज्या किमतीत मिळतात त्या लोकांना घ्याव्या लागत आहेत.

यंदा अवकाळी पाऊस आणि सततचे बदलते हवामान यामुळे भाज्यांची आवक उशिरा वाढली होती. त्यामुळे आधीच भाजीपाल्याची किमती वाढल्या होत्या. आता करोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीचा फटका बसलाआहे.

संचारबंदीत पेट्रोल आणि डिझेलची मारामार आहे, तर दुसरीकडे कामासाठी मजूर मिळत नसल्याने भाजीपाला शेतात पडून आहे. यामुळे भाजीवाल्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती वसईतील भाजी विक्रेते विनोद यादव यांनी दिली.

 

फळांच्या किमतीही वाढल्या

भाज्यांसोबत फळांच्या किमतीतही वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. द्राक्षे ६० रुपये किलोवरून आता १०० ते १२० किलो, केळी ३० ते ४० रुपये डझनवरून आता ७० ते ८० रुपये डझन आणि सफरचंद ८० ते १०० वरून १५० ते १८० रुपये किलो दराने मिळत आहेत.