डॉक्टर गायब, विविध उपकरणे बंद, औषधांची कमतरता; रुग्णांचे हाल

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार :  वसई-विरार महापालिकेने आरोग्य सेवा मोफत दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र डॉक्टरांची आणि औषधांची कमतरता असून रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रे बंद पडली आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांची वाट बघत तासनतास ताटकाळात रहावे लागते तर उपकरणे बंद असल्याने अनेक चाचण्या ह्या आर्थिक भरुदड सहन करत खाजगी रुग्णालयातून कराव्या लागतात. यामुळे पालिकेची मोफत वैद्यकीय सेवा केवळ कागदावरच असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

वसई-विरार महापालिकेने आपली आरोग्य सेवा मोफत केली आहे. संपुर्ण आरोग्य सेवा मोफत देणारी वसई-विरार महापालिका ही एकमेव महापालिका ठरली होती. पालिकेकडे वसईतील सर डी एम पेटीट आणि नालासोपारा येथील तुळींज ही दोन रुग्णालये आणि २१ आरोग्यकेंद्रे आहेत. पालिकेच्या या रुग्णालय आणि आरोग्य सेवेतून रुग्णांवर मोफत उपचार करून विनामूल्य औषधे दिली जातात असा दावा पालिकेने केला करत आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णांची केवळ तपासणी होत असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

पालिकेच्या तुळींज रुग्णालयात अस्थीतज्ज्ञच वेळेवर येत नसून दुखापत झालेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. दुखापत झालेल्या रुग्णांवर रुग्णालयातच प्लास्टर करणे आणि औषधे देणे गरजेचे आहे. मात्र सर्रास रुग्णांना बाहेरून प्लास्टर आणून लावायला सांगितले जात आहे. या रुग्णालयातील एक्स रे मशीन मागील काही महिन्यापासून नादुरुस्त असल्याने रुग्णांना एक्स रे काढण्यासाठी खाजगी लॅबमध्ये जावे लागत आहे. पालिकेकडे अस्थितज्ञ नसून बाहेरून तज्ञ डॉक्टर मागवले जातात. ते आत:वाद्यातून ठरावीक दिवशी येत असल्याने रुग्णांना उपचारासाठी डॉक्टरांच्या वाराची वाट बघावी लागते. अनेकदा तर वारालाही डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.

नालासोपारा पूर्वेच्या गावराई पाडा येथे राहणाऱ्या कृष्णांत मिश्रा या मुलाला खेळताना दुखापत झाली. त्याचे दोन्ही हात मोडले आहेत. त्याचे वडील त्याला तुळींज रुग्णालयात घेऊन गेले. मात्र रुग्णालयातील एक्सरे मशिन बंद असल्याने त्यांना बाहेरून एक्स रे करायला सांगितलं. त्यांनी १४०० रुपये खर्च करून एक्स रे काढला. किमान प्लास्टर तरी रुग्णालय लावून देतील अशी अपेक्षा होती. मात्र मला प्लास्टरदेखील बाहेरून लावायला सांगितले, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

नालासोपारा येथे राहणाऱ्या राजेंद्र दुबे यांना गुडघ्यात त्रास आहे. तीन वेळी त्यांनी रुग्णालयात फेऱ्या मारल्या तेव्हा त्यांना डॉक्टर भेटले. दोन वेळा डॉक्टरांनी तपासले. मात्र औषधे आणि प्लास्टर बाहेरून आणायला सांगितले. मी तासन्तास डॉक्टरांची वाट बघायचो. अनेकदा रिकाम्या हाताने परत जायचो. आता डॉक्टर भेटले. मात्र सर्व काही बाहेरून आणायला सांगितले. मला १ हजार रुपयांचे प्लास्टर बाहेरून आणावे लागले, असे दुबे यांनी सांगितले.

नालासोपारा पूर्वेच्या साडी कंपाऊड येथे राहणाऱ्या फरहीन खान यांनी देखील अशीच कैफियत मांडली. त्यांनी सांगितले की, सोमवारी डॉक्टर नव्हते त्यामुळे परत गेली. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता डॉक्टर आले त्यांनी तपासून मला बाहेरून प्लास्टर आणायला सांगितले. त्याचा खर्च ८५० रुपये आला. मला औषधे दिली नाही. केवळ लिहून दिली. ती मला मेडिकलमधून घ्यावी लागली. त्याचा देखील भरुदड बसल्याचे खान यांनी सांगितले. यामुळे पालिका जरी मोफत वैद्यकीय सेवेचा गाजावाजा करत असली तरी रुग्णांना उपचारासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे महानगरपालिका मोफत आरोग्य सेवेच्या नावाखाली कोटय़वधी रुपये खर्च करत असली तरी रुग्णांना बाहेरून औषधे आणि चाचण्या कराव्या लागत असल्याने रुग्ण हैराण झाले आहेत.

याबाबत खरी माहिती घेतली जाईल, कोणकोणती उपकरणे बंद आहेत याचा अहवाल मागविला जाईल आणि जी उपकरणे बंद आहेत ती पुन्हा दुरुस्त करून घेतली जातील, तसेच औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात आहे. तरी त्याची पाहणी करून सेवा अद्यावत केली जाईल.
– विजय द्वासे, उपायुक्त, आरोग्य विभाग, वसई-विरार महापालिका