ठाण्यातील गायमुख परिसरात भरधाव कारने वाहतूक पोलिसाला उडवल्याची घटनासमोर आली आहे. कारच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा पाय फ्रॅक्चर झाला असून या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे वाहतूक पोलीस शाखेत कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले महादेव हजारे हे रविवारी संध्याकाळी गायमुख परिसरात कर्तव्यावर होते. यादरम्यान मारुती स्विफ्ट कारने त्यांना उडवले. हजारे यांना धडक दिल्यावर कारचालक मदतीसाठी न थांबता तिथून पळून गेला. अखेर स्थानिकांनी आणि पोलिसांनी हजारे यांना रुग्णालयात दाखल केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अद्याप वाहनचालकाला अटक करण्यात यश आलेले नाही. या घटनेत हजारे यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

गायमुख परिसरातील घटनेने वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ठाण्यात यापूर्वीही पोलिसांना फरफटत नेल्याची घटना घडली आहे. अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.