News Flash

अंबरनाथ, बदलापूरमध्ये पाणीटंचाई

पाण्याच्या अतिवापरामुळे कूपनलिकाही आटू लागल्या

(संग्रहित छायाचित्र)

पाण्याच्या अतिवापरामुळे कूपनलिकाही आटू लागल्या; जीवन प्राधिकरणाच्या पुरवठय़ावरही ताण

सागर नरेकर,  लोकसत्ता

बदलापूर : करोना संकटाच्या काळात टाळेबंदीमुळे नागरिक  घरातच खिळून बसल्याने घरगुती पाण्याचा वापर वाढला आहे. पाणी कमी पडू लागल्याने नागरिकांनी आपला मोर्चा कूपनलिकांकडे  वळविल्याची परिस्थिती अंबरनाथ, बदलापूर शहरांत निर्माण झाली आहे. गेल्या २० दिवसांत कूपनलिकांच्या पाण्याचाही वापर मोठय़ा प्रमाणावर झाल्याने त्याही आटू लागल्याचे चित्र आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने देशभरात टाळेबंदी कालावधी वाढवून तो ३ मेपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस घरात काढावे लागणार आहेत.   त्यात करोना विषाणूला रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीत हात धुणे ही बाब महत्त्वाची असल्याने घरातील एखादा सदस्य जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडला असता तो परतल्यानंतर थेट आंघोळ करूनच घरात वावरतो. अशा गोष्टींमुळे पाण्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असून पाण्याची गरजही वाढली आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांत पाणीपुरवठा करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दररोज उल्हास नदीतून सरासरी १०० ते ११० दशलक्ष घनलिटर पाण्याची उचल करते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळही या शहरांना पाणीपुरवठय़ासाठी साहाय्य करते. मात्र सध्या सरासरीपेक्षा अधिकची मागणी वाढल्याने उपलब्ध पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. अनेक गृहसंकुलांकडे कूपनलिकांची व्यवस्था आहे. पाणी कमी पडू लागल्याने  संकुलांनी  कूपनलिकांमार्फत होणाऱ्या पाण्याचा वापर सुरू केला आहे. पाण्यासाठी गेल्या २१ दिवसांच्या काळात या कूपनलिकांचा वापर मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे या कूपनलिकांच्या पाणीपुरवठय़ातही घट झालेली दिसून येते आहे.

शहरांमधील पाण्याची पातळी झपाटय़ाने कमी होते असल्याचे दिसून येते आहे. एकीकडे वाढणारे तापमान, त्यामुळे जलस्रोतांचे होणारे बाष्पीभवन आणि पाणी पातळीवर त्याचा होणारा परिणाम पाहता येत्या काही दिवसांत कूपनलिका रित्या होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. सध्या औद्योगिक पाण्याचा वापर पूर्णपणे बंद असून ते पाणी घरगुती वापरासाठी वळते करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वाढलेल्या टाळेबंदीचा काळ आणि त्यामुळे वाढणारी पाण्याची मागणी याचा विचार करून तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त होते आहे.

या भागांत टंचाई

बदलापूर शहरात सध्या वडवली, फातिमा शाळा परिसर, बेलवली, रमेशवाडी, एरंजाड, सोनिवली, कात्रप आणि शिरगाव या भागांतील इमारतींमध्ये पाणीटंचाई जाणवते आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र जीवन प्राधिकरणाने त्यांना यावर तातडीने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यासाठी हालचालीही सुरू केल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे. अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिमेतील काही भागांतही अशीच परिस्थिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 2:36 am

Web Title: water scarcity in ambarnath badlapur zws 70
Next Stories
1 धान्य बाजार आजपासून सुरू
2 सिगारेटच्या वादातून तरुणाची हत्या
3 Coronavirus : चाचणीला चारचाकीतूनच या!
Just Now!
X