चिखलोली धरणावरील कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथकर वेठीस

अंबरनाथ : चिखलोली धरणातील पाणी वितरण केंद्रात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी वेतन वाढीसाठी बुधवार सायंकाळपासून शहरातील पाणीपुरवठा रोखून नागरिकांना वेठीस धरले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कामगारांना विनंती केल्यानंतरही त्यांनी कामबंद सुरूच ठेवल्याने शहराच्या पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम झाला. अखेर स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या मध्यस्थीनंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी काम सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या या नागरिकांना वेठीस धरणाच्या भूमिकेवर आता संताप व्यक्त होत आहे.

पाणीपुरवठा ही बाब अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही मागणीसाठी पाणीपुरवठा रोखून नागरिकांना वेठीस धरणे बेकायदेशीर मानले जाते. मात्र अंबरनाथमधील चिखलोली धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या १२ कंत्राटी कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरले. त्याचा शहराच्या पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी २०१८ मध्ये नाशिक येथील हर्षल टेक्निक्स या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यांचे चिखलोली धरणाच्या ठिकाणी ९ तर नवरे नगर येथील पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी ३ असे एकूण १२ कामगार कार्यरत आहेत. त्यांना दिले जाणारे वेतन तुटपुंजे असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून येथील कंत्राटी कामगार पगार वाढीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मागणी करत होते. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळनंतर धरणातून पाणी वितरण बंद केले. गुरुवार दुपापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्याचा फटका अंबरनाथ पूर्वेतील विविध भागांना बसला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनंती करूनही त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत केला नाही. अखेर स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर यांना मध्यस्थी करावी लागली. वेतनवाढीबाबत मंत्रालय स्तरावर निर्णय घेतला जाईल असे आश्वसन त्यांनी दिले. त्यानंतर म्हणजेच, गुरुवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.