बदलापूर व अंबरनाथ ही शहरे सध्या मुंबई पट्टय़ातील वेगाने वाढणारी शहरे असून राज्य व देशभरातून स्थलांतरितांना सामावून घेण्यात आघाडीवर आहेत. साहजिकच शहरातील नागरी सुविधांवर याचा ताण पडत असून यात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा पुरविण्यात शासनाला कसरत करावी लागत आहे. रस्ते वाढत्या शहराला सध्या अपुरे पडत आहेत. स्थानिक नगरपालिकांनी   शासनाकडून मिळालेल्या निधीच्या सहकार्याने उशिरा का होईना पण, बदलापूर व अंबरनाथ पट्टय़ात मोठय़ा रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे. यात रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण, रस्ते रुंदीकरण, चौपदरी रस्ते, राज्यमार्ग आदी कामांना सुरुवात झाली आहेच, पण या कामांच्या पूर्ततेसाठी रस्त्यात येणाऱ्या अतिक्रमणांनाही हटविण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे. ही कामे स्वागतार्ह असली तरी सध्या काहीशा धिम्या गतीने होत आहेत. याचा फटका नागरिकांना बसत असला तरी, अनेक वर्षांनी शहरातील अंतर्गत रस्ते काँक्रीटचे होत असून दोन्ही शहरांबाहेरून चौपदरी मार्ग पुण्या-मुंबईकडे जात आहेत.
बदलापूर व अंबरनाथ ही उपनगरे जशी रेल्वे मार्गाने सरळ रेषेत आहेत, तशीच रस्त्याच्या मार्गानेही सरळ रेषेत एकमेकांना जोडली गेली आहेत. हा सरळ मार्ग पार कल्याणपासून बदलापूर व अंबरनाथमार्गे कर्जत व पुढे पुण्याकडे जातो. त्यामुळे या वाढत्या शहरांना मुंबई व पुण्याला जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने योग्य पाऊल उचलले असून कल्याणहून थेट कर्जतपर्यंत चौपदरी मार्गाचे काम सुरू केले आहे.  कर्जतपर्यंत जाणाऱ्या या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. बदलापूर शहरातून जाणाऱ्या या मार्गाचे काम पूर्ण झाले असून भविष्यात या मार्गावरील गर्दी वाढल्यास बदलापूर शहराला वळसा घालणारा ५ किमीचा बाह्य़ वळण रस्तासुद्धा बनविण्यात आला आहे. तसेच, उल्हासनगर येथून पुढे अंबरनाथ शहरातून जाणारा मार्ग १०० फुटी करण्यात आला असून तो बदलापूर शहरात येऊन येथील गांधी चौकमार्गे कर्जत कल्याण-कर्जत रस्त्याला जोडला जाणार आहे.