गणेश देशमुख, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका
अंबरनाथ नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय गोंधळाचे वातावरण दिसून येत असून याचा फटका विकासकामांना बसत आहे. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला उणेपुरे पाच महिने होत असतानाच पालिकेतील प्रशासकीय गोंधळामुळे पालिकेची प्रतिमा मलिन होण्याचे प्रकार घडले आहेत. पहिल्याच सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या २५० कोटींच्या ठरावांवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती आणली. यापूर्वीचे मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांचा बदलापूर पालिकेच्या टीडीआर घोटाळ्यात सहभाग असल्याने पदावरून त्यांना हटविण्यात आले. या काही घटनांमुळे पालिकेला आता नवी उभारी घेण्यासाठी योग्य निर्णय घेणाऱ्या धोरणी प्रशासकाची गरज आहे. याच पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून काम करत असलेले गणेश देशमुख यांची अंबरनाथ नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. अंबरनाथ शहराच्या पुढील वाटचालीसंदर्भात ‘लोकसत्ता ठाणे’ने त्यांच्याशी केलेली बातचीत.
’पालिकेतील प्रशासकीय गोंधळावर काय उपाय योजणार?
पालिकेत प्रशासकीय सुधारणांच्या दिशेने प्राथमिकता ठरवून पाऊल उचलणार असून पालिकेचे सर्वसाधारण सभांच्या दरम्यान चालणारे काम सभाशास्त्राच्या नियमांनुसार काटेकोरपणे चालविणार आहोत. गेल्या सभेचे इतिवृत्त वाचन प्रत्येक सभेदरम्यान करणार आहोत. शासन निर्णय, परिपत्रके आदी प्रत्येक सभेच्या वेळी सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहोत. प्रत्येक कार्यालयीन प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांमार्फतच होईल, याची दक्षता घेण्यात येईल. अंदाजपत्रकीय तरतूद, शासकीय अनुदाने या बाबींची पूर्तता करताना कायद्याचे योग्य रीतीने पालन करण्यात येणार असून यासंबंधी स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे ऐंशी टक्क्य़ांपर्यंतचा खर्च निश्चितच करण्यात येईल. यापूर्वी सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावांवर स्थगिती आली. त्याला तत्कालीन प्रशासनाची चूक कारणीभूत असून त्यांनी सदस्यांना याबाबत योग्य ती माहिती देणे आवश्यक होते. असले प्रकार इथून पुढे होणार नाहीत आणि सदस्यांना सभांच्या वेळी योग्य ती माहिती दिली जाईल. यापूर्वी प्रशासनाकडून झालेल्या त्रुटी इथून पुढे होणार नाहीत, याची जातीने काळजी घेणार आहे.
’पालिकेतील दप्तर दिरंगाईवर काय पाऊल उचलणार?
दप्तर दिरंगाई इथून पुढे खपवून घेतली जाणार नसून यासाठी प्रत्येक विभागाला सूचना देणार आहे. तसेच, प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन याबाबत कळविण्यात येईल. या मुद्दय़ावरचे सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे, येत्या महिनाभरातच आम्ही नागरिकांची सनद जाहीर करणार आहोत. त्यायोगे नागरिकांचे प्रत्येक काम वेळेत पूर्ण होईल याची हमी नागरिकांना देण्यात येईल. नागरिकांना मुदत देऊन या विहित मुदतीत त्यांच्या प्रश्नांची तड लावण्यात येईल. नागरिकांच्या प्रश्नाबाबत हयगय झाल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच, पालिकेत यापूर्वी कधीच नसलेल्या, मात्र काळाची गरज असलेल्या जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल, ज्यांच्यामार्फत माध्यमे व नागरिकांना वेळोवेळी उपयुक्त माहिती देण्यात येईल.
’शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर काय कारवाई करणार?
राज्य शासनाच्या २००९ च्या अनधिकृत बांधकामांशी संबंधित आदेशांप्रमाणे नगरपालिकेत अतिक्रमणे पाडण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक आवश्यक आहे. मात्र, अशी नेमणूक यापूर्वी पालिकेत झालेली नाही. त्यामुळे अतिक्रमणे पाडण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक प्रथम करणार आहे. सध्या संपूर्ण शहरात असलेल्या अनधिकृत बांधकामांचा आढावा घेत आहे. या संदर्भात दर महिन्यात बैठका घेणार असून पुढील महिनाभरातच शहरातील अशी बांधकामे पाडून टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल.
’रस्ते व सिमेंट काँक्रीटीकरणाच्या संथ कामांबाबत काय पाऊल उचलणार?
कोणतेही विकासकाम चालू असताना त्या कामासाठी टप्पे आखून दिलेले असतात. या प्रत्येक टप्प्यासाठी ठरावीक कालावधी देण्यात आलेला असतो. या कालावधीत काम होत आहे किंवा नाही याची माहिती पालिकेने घेणे आवश्यक आहे. हे काम यापूर्वी होत नव्हते. ते आता जातीने लक्ष घालून करणार आहे. भुयारी गटार व रस्ते काँक्रीटीकरणाची कामे करताना ठेकेदाराकडून तक्रार असल्यास त्याचे पालिकेकडून निवारण करण्यात येईल व ठेकेदाराकडून दिरंगाई झाल्यास त्याच्याकडून दंड आकारण्यात येईल. तसेच, भुयारी गटार व रस्ते काँक्रीटीकरण कामांची जबाबदारी असलेल्या संबंधित अभियंत्यांना यापूर्वीच वेळोवेळी येणाऱ्या अडचणींची माहिती मला देण्यास सांगितले असून यासाठी संबंधितांसोबत साप्ताहिक बैठकाही घेण्यात येणार आहेत. या कामांबाबत इथून तक्रारींना वाव ठेवला जाणार नाही.
’कर संकलनात वाढीसाठीचे कोणते उपाय योजणार?
अंबरनाथ नगरपालिका हद्दीत सध्या नवी बांधकामे झाली असून या नव्या मालमत्तांची नोंद होत आहे. सध्या अंदाजे पालिकेत ५५ हजारांच्या घरात मालमत्ता आहेत. मात्र, नव्याने झालेल्या व यापूर्वीच्या मालमत्तांचे फेरमूल्यांकन सुरू आहे. सदनिका, व्यावसायिक मालमत्ता यांचे फेरमूल्यांकन झाल्यानंतर किमान २२ हजार मालमत्तांची भर पडणार आहे. त्यामुळे जवळपास ७७ हजार मालमत्ता या फेरमूल्यांकनानंतर समोर येतील, ज्यामुळे पालिकेला कररूपाने मिळणाऱ्या महसुलात वाढ होऊ शकेल व ज्याचा वापर विकासकामांसाठी करता येईल. त्यामुळे कर संकलन विषयावर सध्या प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
’भविष्यातील वाटचाल व प्रकल्पांबद्दल काय सांगू शकाल?
पुढील वाटचालीत नागरिकांच्या तक्रारींकडे अधिक लक्ष देणार असून नागरिकांना माझ्या उपलब्ध वेळेतील जास्त वेळ देणार आहे. तसेच, शहरातील कचऱ्याची समस्या तात्काळ दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. संपूर्ण शहरात माहिती फलक लावण्यात येणार असून त्याद्वारे वेळोवेळी नागरिकांशी संबंधित माहिती व सूचना जाहीर करण्यात येणार आहे. आगामी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी प्राधान्याने येणारे प्रकल्प म्हणजे पालिकेची प्रशासकीय इमारत व स्टेडियम हे प्रकल्प. पालिकेच्या सध्याच्या इमारतीच्या जागीच नवी प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच, मंजूर विकास आराखडय़ाप्रमाणे शहरात स्टेडियमही मंजूर असून त्याच्या कामासाठीच्या हालचाली सुरू करण्यात येणार आहेत. सध्या शहरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. ४५ दशलक्ष लिटर्स क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आम्ही ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत सुरू करणार आहोत. तसेच, सध्या सुरू असलेले पालिकेचे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येईल.

Farmers will get the amount of difference of cotton and soybeans says devendra fadnavis
फडणवीस निवडणूक सभेत म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीनमधील फरकाची रक्कम…
nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत