ठाणे : भिवंडी येथील मानससरोवर रोड भागात पतीच्या छळाला कंटाळून शनिवारी ज्योती गायकवाड (३०) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ज्योतीचा पती नीलेश गायकवाड (३१) याला अटक केली आहे.

मानससरोवर रोड येथील ज्योतिबा नगर परिसरात नीलेश गायकवाड हा त्याची पत्नी ज्योती आणि मुलासोबत राहतो. दररोज नीलेश आणि ज्योतीमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असत. या वादातून नीलेश हा ज्योतीला दारू पिऊन मारहाण करत असे. शनिवारी रात्री नीलेश आणि ज्योती यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यानंतर नीलेश हा त्याच्या लहान मुलाला बाहेर घेऊन गेला असता, ज्योतीने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर रविवारी ज्योतीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात नीलेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नीलेशला अटक केली आहे.