बदलापूर – अंबरनाथ परिसरात महिलांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून दहा-बारा महिलांनी मिळून बदलापूर पश्चिमेकडील एका इमारतीच्या बांधकामस्थळी रात्री जाऊन विद्युत कामासाठी लागणाऱ्या तारांची जवळपास १ लाख ६५ हजारांची बंडले चोरून नेली आहेत. त्यामुळे, शहरात सोनसाखळी चोर, घरफोडी करणारे चोर, दरोडा घालणारे, बँकांना फसवणारे आदींच्या बरोबरीनेच आता महिला चोरही शहरात चोरी करू लागले आहे.
बदलापुरात गेल्या काही दिवसांत चोरीचे वाढलेले प्रमाण चिंताजनक असून यांमुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. येथे सोनसाखळी चोरांकडून चोऱ्या व घरफोडय़ा सर्रास घडतात. मात्र, याव्यतिरिक्तही लोकांना गुंगारा देऊन फसवणे, बँकांची लुबाडणूक करणे, खोटा माल विकणे आदी प्रकारचे वेगळ्या मानसिकतेतून केलेल्या गुन्ह्य़ांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यातच आता महिलांच्या दहा-बारा जणांच्या गटाने एका बांधकामस्थळी चोरी केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली गाव येथील अरिस्टा या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी घडली आहे. तिथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या खोलीत विद्युत कामासाठी लागणाऱ्या तारांचे बंडल व इतर साहित्य ठेवले होते. रात्रीच्या वेळी १० ते १२ महिलांनी शिडी लावून या खोलीत प्रवेश करत खिडकीची काच तोडून आत प्रवेश केला. दरवाजा आतून उघडून इतर महिलांनीही आत प्रवेश केला. या खोलीत ठेवलेले १ लाख ६५ हजार ८४८ रुपये किमतीचे विद्युत तारांची ६५ बंडले चोरून नेली. या ठिकाणी काम पाहणारे आशुतोष शर्मा यांनी सीसीटीव्हीवरील चित्रफीत पाहिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.