हास्य कवी अशोक नायगावकर यांचे मत

ठाण्यात अनेक कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम, शिबिरांचे आयोजन केले जाते. असे असूनही अनेकदा युवकांना संधी मिळत नाही. त्यामुळे युवक कलाकारांचे कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहचत नाहीत. व्यासपीठ नसल्यामुळे अनेकांना त्यात सहभागी होता येत नाही. या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील बाळकुम गावातील युवकांनी आगरी ऑल इन वन संस्थेच्या सहकार्याने ‘युवा सांस्कृतिक कट्टा’ सुरू केला आहे. या कट्टय़ाचा शुभारंभ नुकताच हास्य कवी अशोक नायगाकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी बाळकुम गावात भौतिक सुबत्तेच्या संगतीने युवा संस्कृतीला पोषक वातावरण उभे रहात आहे, असे प्रतिपादन नायगावकर यांनी केले.

युवा सांस्कृतिक कट्टय़ाच्या शुभारंभाप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोहा कोटकर यांच्या आगरी कोळी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील एकपात्री अभिनयाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी अशोक नायगावकर, शाहिर नंदेश उमप, गायिका अनुजा वर्तक यांच्या समवेत ‘थेट-भेट’ या मुलाखतपर कार्यक्रमाचे संयोजन केले.

या कार्यक्रमात नायगावकरांनी पुण्यातील आणि मुंबईतील माणसांमध्ये किती विषमता आहे हे आपल्या शैलीत विनोदी कवितेने सर्वाना सांगितले. अरुण म्हात्रेंनी त्यांच्या कवितेने कार्यक्रमात रंगत आणली. बाळकुम म्हणजे ठाण्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर अशी ओळख व्हायला हवी, असेही ते यावेळी म्हणाले.