तलावांकाठची गर्दी आता पाचपाखाडी, हिरानंदानी परिसरातील खाऊगल्ल्यांमध्ये

ठाणे : एकेकाळी तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात तलाव हे केवळ नैसर्गिक संपदेचे प्रतीक नव्हते, तर शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक भेटीगाठींची केंद्रेही होती. विकासाच्या ओघात काही तलाव नामशेष झाले, तर काहींच्या ठिकाणचा निवांतपणाच हरवून गेला. हा निवांतपणा आणि आनंद अनुभवण्यासाठी तरुणाई नव्या ठाण्याच्या दिशेने वळू लागली आहे. घंटाळी, पाचपाखाडी, हिरानंदानी मेडोज या परिसरात वसलेल्या खाऊगल्ल्या तरुणवर्गाला खुणावू लागला असून ही ठाण्याची नवी विरंगुळा केंद्रे बनली आहेत.

पूर्वी तलावकाठचा परिसर हा ठाणेकरांसाठी विरंगुळय़ाचे ठिकाण असायचा. घोडे, टांग्यांची रपेट, भेळपुरी, पाणीपुरीचे ठेले, मुलांसाठीचे छोटे आकाशपाळणे यांमुळे तलावांच्या काठी सायंकाळी आबालवृद्धांची गर्दी दिसायची. पण कालौघात तलावकाठच्या परिसराची रया निघून गेली आणि ठाणेकरांचा विरंगुळय़ाच्या नव्या ठिकाणांचा शोध सुरू झाला. त्यातही तरुणवर्गाला खाद्यपदार्थावर ताव मारण्यासोबतच मित्रमंडळींसोबत तासन्तास गप्पा मारता येण्यासारख्या ठिकाणांची गरज होती. ही गरज घंटाळी, हिरानंदानी आणि पाचपाखाडी या परिसरातील खाऊगल्ल्या भागवत आहेत.

केक्स, फ्राईज, मोमोज, तंदूर अशा तरुणांमध्ये लोकप्रिय असणारे फास्ट फूड एकाच ठिकाणी या परिसरात उपलब्ध होत असल्याने महाविद्यालयीन मित्रमैत्रिणींना भेटायचे ठरवल्यावर पाचपाखाडी हे हक्काचे ठिकाण ठरले आहे, असे सिद्धार्थ गवळी याने सांगितले. नव्या ठाण्यात बडय़ा गृहसंकुलाभोवती याचप्रकारे उभ्या राहिलेल्या खाऊगल्ल्यांकडे तरुण सायंकाळी मोठी गर्दी करतात. हिरानंदानी मेडोज, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे असणारे कॅफेज तरुणांना खास आकर्षित करत असल्याने सायंकाळी तरुणांचा घोळका या ठिकाणी पाहायला  मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत कोठारी कंपाऊंडमध्ये असणाऱ्या पब्ज आणि हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली असली तरी हा परिसर तरुणांना आजही खुणावत असतो. आधुनिक जीवनशैली आत्मसात करताना या ठिकाणी असणाऱ्या पब्जमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर मद्याचा आनंद घेण्याची मजा वेगळी असते. त्यामुळे ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरात राहताना या परिसराचे आकर्षण आहे, असे पार्थ ब्रीद याने सांगितले.

खाद्यसवलतींच्या वेळी रस्त्यावर रांगा

पाचपाखाडी परिसरात नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून या ठिकाणी नव्याने उभे राहणारे कॅफेज, केकची दुकाने या ठिकाणी आपल्या खाद्यपदार्थाची ओळख करून देण्यासाठी काही सवलती देण्यात येतात. या सवलतींची माहिती मिळताच दुकानाबाहेरच रस्त्यावरील पदपथांवर खवय्यांच्या अक्षरश: रांगा लागतात. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी असलेल्या एका दुकानात संबंधित दिवशी असणाऱ्या तारखेच्या किमतीत खाद्यपदार्थ विकण्यात येत असल्याने नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. मात्र या सवलतींमुळे दुकानांची ओळख होते आणि ठाण्यातील नागरिक या परिसराकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असल्याने याचा व्यवसायातही फायदा होतो, असे येथील एका दुकानदाराने सांगितले.

सुट्टीच्या दिवशी मात्र कोंडी

एरवी सायंकाळी या ठिकाणी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानाबाहेर तरुण जमत असले तरी आठवडय़ाच्या सुट्टीच्या दिवशी या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात कोंडी होत असते. हिरानंदानीसारख्या परिसरात याचा फटका बसत नसला तरी पाचपाखाडी परिसरात रस्त्यावरच दोन्ही बाजूला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत असते.

गेली अनेक वर्षे ठाण्यात राहत असल्याने तलावपाळीशिवाय फिरण्याचे ठिकाण नव्हते. आता पाचपाखाडी, हिरानंदानी मेडोजसारखे परिसर असल्याने मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी या जागा सोयीस्कर वाटतात.

– प्रणाली साळुंके