दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा (प्रिलिम्स) संपल्या, की शाळा-शाळांमधून 10th students farewell कार्यक्रम आयोजित केला जातो आणि विद्यार्थीदेखील त्याची जोरदार तयारी करतात.  पण हे सगळं करीत असताना त्यांच्या मनात संमिश्र भावना असतात. नवीन कॉलेजविषयी औत्सुक्य असतं, तर आपली शाळा आणि तेथील सुरक्षित वातावरणातून बाहेर पडावे लागणार याची रुखरुख असते.  हे लक्षात घेऊनच या दिवशी संपूर्ण शाळा या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगून, योग्य दिशेने वाटचाल करून यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करतात, आत्मविश्वास निर्माण करतात आणि गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्या मागे आहोत, हा विश्वास, आश्वासक आधारही देऊ करतात.

शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा (लव्हाळी, ता. अंबरनाथ) येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण १० वर्षे आश्रमशाळेत राहिल्याने तो भावनिकरीत्या जोडला गेलेला असतो. आदिवासी बांधवांची जीवनशैली सर्वसाधारण समाजापेक्षा खूपच वेगळी असल्याने मुख्य समाजप्रवाहात सामावून घेऊन स्वत:ला सिद्ध करणे हे या मुलांसाठी मोठे आव्हान असते. इयत्ता नववीचे विद्यार्थी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात, तर दहावीचे विद्यार्थी आपले अनुभव सांगतात. गेल्या वर्षी पहिली आलेली विद्यार्थिनी निरगुडा हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी, अगदी शिपाईदेखील सर्वानी शुभेच्छा दिल्या. तुमच्या प्रयत्नांच्या बळावर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि शाळा सदैव तुमच्यासाठी आहे, हा विश्वास देण्याचा, आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न साऱ्या भाषणांमधून प्रकर्षांने जाणवत होता.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड

ठाण्यातील वसंत विहार परिसरातील अनमोल विद्यालयातील निरोप समारंभात विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी वर्ग आणि पदाधिकारी आवर्जून सहभागी होतात. या वर्षी दीपप्रज्वलन, स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. इयत्ता आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसमोर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वानी आपण कळत नकळत कोणत्या चुका केल्या आणि त्या इतर सर्व विद्यार्थ्यांनी का करू नयेत, ते प्रांजळपणे सांगितले. इयत्ता आठवी-नववीच्या वर्गप्रतिनिधींनी त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पदाधिकारी प्रत्येकाने विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या, पण त्याचबरोबर पोटतिडिकीने चांगले वागण्याचा, चांगल्या मार्गावरून प्रयत्नांची कास धरून वाटचाल करण्याचा, चांगले आचारविचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनीदेखील आयुष्यात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात ते सांगताना तुमचे आयुष्य तुम्हाला घडवायचे असल्याने तुम्हालाच विचार करून पुढे जायचे आहे, ते सोप्या भाषेत समजावून सांगितले.

सौ. आनंदीबाई जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे दहावीचे विद्यार्थी सेण्ड ऑफच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. शिक्षक, मुख्याध्यापक, डीन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेखा ठरते. साधारणपणे काही गाणी, वादन, नाटय़छटा, एखादी पीपीटी अशा स्वरूपाचा कार्यक्रम असतो. या दिवशीचा पेहराव आणि कार्यक्रमाचा दर्जा याबाबत शाळेचा कटाक्ष असतो. मुलांना मोबाइल कॅमेऱ्याने फोटो काढायला (शाळेत) परवानगी नसते आणि कार्यक्रमाचे फोटो शाळेतर्फे काढले जातात. यानिमित्ताने संस्कृत गाणी किंवा संस्कृतमधील भाषण, शाळेचे महत्त्व सांगणारी विद्यार्थ्यांनी तयार केलेली पीपीटी मुलांमधली सर्जनशीलता तर दाखवतेच, पण मुले शाळेशी कशी जोडली आहेत, त्यांच्या जीवनात शाळेलाही महत्त्व आहे, ही गोष्ट सर्व शाळेला समाधान देणारी असते. ही मुले आयुष्यात चांगल्या मार्गाने जाऊन यशस्वी होतील, हा विश्वासही देणारी असते.

ज्याप्रमाणे शाळांमधून दहावीच्या मुलांसाठी सेण्ड ऑफ कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याप्रमाणेच डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या पूर्वप्राथमिक विभागातही गेली १० वर्षे सेण्ड ऑफचा कार्यक्रम असतो. मोठय़ा शिशूमधून पहिलीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मुख्याध्यापिका विदुला वैद्य यांनी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आणि मुले खरोखरच या दिवशी खूप मजा करतात. वार्षिक परीक्षेच्या शेवटच्या दिवशी हा सेण्ड ऑफ दिला जातो. मुलांना खाली मैदानात फिरण्यास नेले जाते. त्यांचे काही गमतीचे खेळ घेतले जातात. रंगीबेरंगी कपडे घालून मुले छान बागडतात, खाऊ खातात, खेळतात आणि खूप धमाल करतात.

पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या भारत नाइट हायस्कूलमध्येदेखील दहावीच्या विद्यार्थ्यांना सेण्ड ऑफ दिला जातो. या कार्यक्रमात इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनादेखील आवर्जून सहभागी करून घेतले जाते. परिस्थितीशी संघर्ष करीत, स्वत: अर्थार्जन करीत (बऱ्याचदा) शालान्त परीक्षा उत्तीर्ण होणे आणि पुढील वाटचाल करणे, स्वत:ला सिद्ध करणे हे या विद्यार्थ्यांसाठी तसे खडतरच असते. त्यामुळे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक या मुलांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगून, परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता त्यातून बाहेर पडण्याचा सल्ला देताना त्यांना प्रोत्साहित करतात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतात. प्रयत्न केल्यानंतर यश मिळणारच आहे, हा विश्वास देऊ करतात. दहावीचे विद्यार्थी आपले मनोगत मोकळेपणाने व्यक्त करतात, अडीअडचणी सांगतात. हे सर्व विचार इतर विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरतात, कारण त्यातून त्यांना अनेक प्रश्नांचे पर्याय सापडतात. या दिवशी सर्व शिक्षक पुन्हा एकदा आपापल्या विषयांसंदर्भात परीक्षेच्या दृष्टीने सर्व सूचनांची उजळणी करतात आणि यशस्वी कसे होता येईल, ते समजावून सांगतात. विद्यार्थी शिक्षकांसाठी प्रेमाने फुले भेट म्हणून आणतात.

ठाण्यातील भगवती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता नववीचे विद्यार्थी दहावीच्या सेण्ड ऑफ कार्यक्रमासाठी पुढाकार घेतात. त्यांच्यासाठी छान निमंत्रण पत्रिका तयार करतात. त्यांची शाळेतली वाटचाल दाखविणारी पीपीटी तयार करून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देतात, तर दहावीचे विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील आतापर्यंतची वाटचाल, शाळा आणि शिक्षक याविषयी बोलतात. यानिमित्ताने शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ‘‘आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे, हे नक्की ठरवून त्याचा योजनापूर्वक पाठपुरावा केल्यास यश नक्कीच प्राप्त करता येईल. एक गोष्ट आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे की, आता केवळ गुणवत्ता हा निकष महत्त्वाचा राहिलेला नाही, तर एकंदरीत व्यक्तिमत्त्व, अवांतर वाचन, संभाषणकौशल्य, नेतृत्वगुण, समयसूचकता इ. गोष्टीही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण ती काळाची खरी गरज आहे.’’ अशा तऱ्हेने शाळेने आजपर्यंत दिलेले आचारविचार, केलेले संस्कार, देऊ केलेली सकारात्मक दृष्टी, जीवनाला सामोरे जाण्याची प्रेरणा अशी समृद्ध शिदोरी घेऊन विद्यार्थी शाळेचा निरोप घेतात!