२५० इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश; रहिवासी आक्रमक
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांत धोकादायक आणि अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सुमारे २५० इमारती पावसाळ्यापूर्वी तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी दिले. आयुक्तांच्या नव्या आदेशामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या इमारती रिकाम्या करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. यामुळे रहिवासी आणि महापालिकेतील संघर्ष पेटण्याची चिन्हे असल्याचा प्रत्यय शनिवारी आला.
वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक ५४ आणि ५५ अतिधोकादायक ठरवून रिकामी करावयास गेलेल्या महापालिकेच्या पथकाला शनिवारी रहिवाशांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. रहिवाशांचा रुद्रावतार पाहून पालिकेच्या पथकाने इमारत रिकामी करण्याची कारवाई सोमवापर्यंत स्थगित केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी या वेळी रहिवाशांच्या बाजूने उभे राहिल्याने या मुद्दय़ावरून येत्या काळात राजकीय संघर्षही तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत सुमारे दोन हजारांहून अधिक धोकादायक इमारतींची यादी मध्यंतरी अतिक्रमण विरोधी पथकाने जाहीर केली होती, मात्र राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार या इमारतींचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्याचा निर्णय आयुक्त जयस्वाल यांनी जाहीर केला. त्यानुसार ज्या इमारती तात्काळ निष्कासित करणे भाग आहे अशा अतिधोकादायक आणि ज्या इमारती दुरुस्तीसाठी तात्काळ रिकाम्या कराव्या लागतील अशा इमारतींची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.

‘बिल्डरच्या दबावामुळे घाई’
धोकादायक इमारतींसंबंधी महापालिका कार्यालयात तातडीची बैठक सुरू असताना वर्तकनगर परिसरातील म्हाडा वसाहतीतील दोन अतिधोकादायक इमारती रिकाम्या करावयास गेलेल्या महापालिकेच्या पथकास रहिवाशांच्या तीव्र विरोधास सामोरे जावे लागले. अवघ्या तीन वर्षांपूर्वी सुमारे ७६ लाख रुपयांचा खर्च करून महापालिकेने या इमारतींची दुरुस्ती केली आहे. असे असताना केवळ पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या बिल्डरच्या दबावामुळे महापालिकेचा एक वरिष्ठ अधिकारी या इमारतींमधील रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढत असल्याचा आरोप या वेळी आक्रमक झालेल्या रहिवाशांनी केला. त्यानंतर या कारवाईला दोन दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली.