उल्हासनगर: शहरातील राजकीय पक्ष, संघटना आणि आस्थापनांनी विना परवानगी जाहीरात, फलकबाजी करू नये यासाठी उल्हासनगर महापालिकेने जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार गेल्या आठवडाभरात उल्हासनगर शहरातील विविध राजकीय पक्ष, संस्था, रिक्षा संघटना अशा २२४ माहिती, जाहिरात फलकांवर कारवाई करत ते हटवले आहेत. शहरातल्या चारही प्रभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये सहायक प्रभाग आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

उल्हासनगर शहरात विना परवानगी जाहिरात फलक, झेंडे यांच्यामुळे शहराच्या विविध चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे. याविरूद्ध शहरातील सामाजिक कार्यकर्ते सतत पाठपुरावा करत होते. अशा बेकायदा पद्धतीने फलकबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती. काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी शहरातील अधिकृत जाहिरातींच्या जागा जाहीर केल्या होत्या. मात्र त्यानंतरही मिळेल त्या ठिकाणी विना परवानगी फलकबाजी सुरूत होती. त्यामुळे ९ जून रोजी महापालिका आयुक्तांनी शहरात कोणत्याही ठिकाणी विनापरवानगी जाहिरात फलक, होडींग, बॅनर, पोस्टर, कटआऊट, झेंडे लागणार नाहीत याबाबत राजकीय पक्षांना पत्र दिले होते. बेकायदा फलक लावल्यास त्याचा दंड निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवाराच्या नावे जमा करण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे बेकायदा बॅनर, फलक काढण्याच्या आवाहनाला दोन आठवडय़ांचा कालावधी उलटल्यानंतर उल्हासनगर महापालिकेने अशा फलकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. १४ जून ते २१ जून या काळात उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या अखत्यारितील प्रभागांमध्ये कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त शहर जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती सहायक आयुक्त गणेश शिंपी, तुषार सोनवणे, अजित गोवारी आणि महेंद्र पंजाबी यांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत २२४ फलक हटवण्यात आले आहेत. राजकीय पक्ष, संघटना, संस्था, रिक्षा संघटना यांनी ठिकठिकाणी कायमस्वरूपी लावलेले लोखंडी फलक, झेंडे, कमानी यात हटवण्यात आल्या. यात प्रभाग समिती क्रमांक एकमध्ये ८०, दोनमध्ये ६४, तीनमध्ये ४५ तर प्रभाग समिती क्रमांक चारमध्ये ३५ फलकांवर कारवाई करण्यात आली. हीच कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

बेकायदा बॅनर छापू नका

राजकीय पक्षांना विना परवानगी बॅनर, फलक, झेंडे, कमानी लावू नका असे आवाहन केल्यानंतर पालिका प्रशासनाने बेकायदा बॅनरवर आळा घालण्यासाठी थेट बॅनर छापणाऱ्या छापखान्यांनाच परवानगी नसलेले बॅनर न छापण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला छापखाने मालक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.