शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांची सोमवारी संध्याकाळी शहरात प्रचार फेरी काढण्यात आली होती. रस्त्यावर अमाप वाहने असण्याच्या वेळेत प्रचार फेरी काढण्यात आली. त्यामुळे डोंबिवली पूर्व भागातील घरडा सर्कल ते चार रस्ता, टिळक चौक परिसरात झालेल्या वाहतूक कोंडीत नोकरवर्ग अडकला.
शिवसेनेच्या प्रचार फेरीबरोबर गल्लीबोळात अन्य पक्षांच्या प्रचारफेऱ्या सुरू होत्या. त्यामुळेही वाहतूक कोंडीत आणखी भर पडली होती. अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊनही कोठेही वाहतूक पोलिसांच्या शिट्टय़ांचा आवाज येत नव्हता. आदित्य यांची प्रचार फेरी संध्याकाळी असल्याने त्याप्रमाणे वाहतूक विभागाने नियोजन करणे आवश्यक होते; परंतु, तसे कोणतेही नियोजन प्रचार फेरीच्या वेळी दिसत नव्हते.
डोंबिवली पूर्व भागातील स. वा. जोशी शाळा येथून संध्याकाळी प्रचार फेरीला सुरुवात झाली. या वेळेत नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरातील कंपन्यांमधील कर्मचारी कंपन्यांच्या बसने मोठय़ा संख्येने शहरात येतो. त्याच वेळी आदित्य यांची प्रचार फेरी सुरू झाली. मंजुनाथ शाळा, पाथर्ली, शेलार नाका, गोग्रासवाडी, शांतीनगर या भागांतून प्रचार फेरी जात होती. त्या वेळी प्रचार फेरीतील वाहने, प्रचारक महिला, पुरुष मोठय़ा संख्येने रस्त्यावरून घोषणाबाजी करीत जात होते. शिवसेनेचे स्थानिक नेते फेरीच्या अग्रस्थानी होते; परंतु त्यांनीही प्रचाराच्या नादात कोंडीकडे लक्ष देणे टाळले. या साऱ्या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

कोंडीची पाच वर्षे..
मागील वीस वर्षे पालिकेतील सत्तेत असूनही शिवसेना-भाजप शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवू शकली नाही. माजी महापौर वैजयंती गुजर यांनी पाच वर्षांपूर्वी महापौर होताच, शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याची घोषणा केली होती. ती कागदावरच राहिली. शिवसेनेच्या पालिकेतील सत्तेने वाहतूक कोंडीवर मात करणारा एकात्मिक शहर वाहतूक आराखडा मंजूर केला आहे. तोही लालफितीत अडकला आहे. शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी सोडवणारा गोविंदवाडी वळण्याचा रस्त्याचा प्रश्न शिवसेना गेल्या चार वर्षांपासून सोडवू शकली नाही. अशा परिस्थितीत सेनेला वाहतूक कोंडी करण्याचा अधिकार नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत होत्या. आदित्यनी प्रचार फेरीला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित महिला, तरुणांशी संवाद साधला. आदित्य यांच्यासोबत सजवलेल्या टेम्पोत पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते.