ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आखण्यात आलेल्या कळव्यातील नियोजित चौपाटीचा मार्ग अतिक्रमणधारकांनी एकीकडे अडवून ठेवला असताना घोडबंदर मार्गावरील गायमुख परिसरात पर्यटन केंद्र उभारणीस मात्र महाराष्ट्र सागरी किनारा नियमन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) हिरवा कंदील दाखविला आहे. मेरिटाइम बोर्ड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमान सुमारे दहा कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हाऊसबोट, साहसी क्रीडा संकुल तसेच नियोजित गायमुख बंदराला लागून स्पीड बोटींसाठी ६० मीटरचा पट्टा विकसित केला जाणार आहे.
विशेष म्हणजे, पर्यावरण विभागाच्या अपेक्षित मंजुरी मिळण्यापूर्वीच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा वर्षभरापूर्वी शुभारंभाचा बार उडविण्यात आला आहे.
ठाणे शहराला लाभलेल्या विस्तीर्ण अशा खाडी किनाऱ्यावर एखादे पर्यटन केंद्र उभारावे, अशा स्वरूपाचे मागणी सातत्याने केली जात होती. यासंबंधीचा एक प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने तयार केला. घोडबंदर मार्गावर गायमुख खाडी किनारी अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे १३ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. या प्रकल्पासाठी मेरिटाइम बोर्ड तसेच पर्यटन विकास महामंडळाची मदत घेण्याचेही ठरले. यासंबंधीच्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आली. मात्र, पर्यावरण विभागाची आवश्यक मंजुरी नसतानाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेत्यांच्या हस्ते शुभारंभाचा बार उडवून देण्यात आला. अपेक्षित मंजुरी नसताना हा शुभारंभ सोहळा कशासाठी, असा सवाल एकीकडे उपस्थित होत असताना तब्बल वर्षभरानंतर  सागरी किनारा नियमन व्यवस्थापन समितीने या प्रकल्पास हिरवा कंदील दाखविला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी जेटी, हाऊसबोट, साहसी क्रीडा संकुल तसेच हॉटेलची उभारणी केली जाणार आहे. काम सुरू झाल्यापासून येत्या १८ महिन्यांत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. गायमुख बंदराला लागून स्पीड बोटींसाठी ६० मीटरचा पट्टा विकसित केला जाणार असून मिरा-भाइंदर, वसई-विरार, कळवा-मुंब्रा, दिवा, डोंबिवली अशा पट्टय़ात जलवाहतूक सुरू झाल्यास त्याचा उपयोग होईल, असा दावा महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. ठाण्यातील पहिले पर्यटन केंद्र म्हणून हा पट्टा विकसित केला जात असल्याचा दावा केला जात असला तरी कळवा चौपाटीच्या अडवणुकीच्या मुद्दय़ावरून नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.