‘सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटांची गरज’

भरकटत चाललेल्या समाजाला जागे करायचे असेल तर सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे,

भरकटत चाललेल्या समाजाला जागे करायचे असेल तर सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे, असे मत लेखक, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी व्यक्त केले. जोशी-बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयातील फिल्म सोसायटी, पत्रकारिता अभ्यासक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘भारतीय सिनेमा काल, आज आणि उद्या’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह, समन्वयक प्रा. महेश पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलताना अनंत महादेवन म्हणाले, ‘केवळ लोकप्रियता आणि शंभर करोड क्लब हेच आजच्या चित्रपटांचे उद्दिष्ट झाले आहे. आज गल्लाभरू चित्रपट एकामागोमाग एक येत असल्यामुळे सामाजिक आशय मांडणारे चित्रपट दुर्मीळ झाले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी ज्या उद्दात्त हेतूने चित्रपटांची निर्मिती केली तो हेतूच नाहीसा झाल्याचे महादेवन म्हणाले. ‘सत्यजीत रे’ यांच्या सर्वच चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले. मात्र एकाही चित्रपटाला ऑस्कर मिळू नये याचे वाईट वाटते. चित्रपट निर्मिती हे एक आव्हान आहे, असे सांगून महादेवन यांनी चित्रपटसृष्टीचा इतिहास उलगडला.
प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह म्हणाल्या, जुन्या चित्रपटातून अतिशय चांगल्या प्रकारे विषयांची मांडणी केली जात असे. आताचे अनेक चित्रपट पाहिल्यावर दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे असते तेच कळत नाही. जोशी-बेडेकर महाविद्यालयात प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांना पाश्चात्त्य भाषेतील एक चित्रपट दाखविला जातो. फिल्म सोसायटीचे सदस्य असल्यामुळे अनेक अनुभवी दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. या वेळी प्रा. महेश पाटील यांनी राष्ट्रीय परिषदेमागील हेतू स्पष्ट केला. प्रा. क्रांती डोईबले यांनी परिषदेचे सूत्रसंचालन केले. या राष्ट्रीय परिषदेसाठी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर, रफीक बगदादी, रेखा देशपांडे यांनी चित्रपट समीक्षेबद्धल आपले मत मांडले, तसेच लेखक डॅनियल कूपर यांनी गुरुदत्त आणि सत्यजीत रे यांच्या चित्रपट प्रवासाबद्दलचा आढावा मांडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anant mahadevan attended national conference on marathi cinema kalaaj aani udya