कल्याण – मुरबाड येथील शिवळे येथे शुक्रवारी रात्री आयोजित केलेल्या मोजक्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांनी नाव न घेता मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांना लक्ष्य केल्याने, येत्या काळात मागील दोन महिन्यांपासून शमलेला कथोरे-पाटील वाद पु्न्हा जोरदार पेटण्याची चिन्हे आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मोजक्या भाजप पदाधिकाऱ्यांशी (पाटील समर्थक) संवाद साधावा म्हणून केंद्रीय मंत्री कपील पाटील शुक्रवारी मुरबा़ड जवळील शिवळे येथील मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे चिरंजीव सुभाष पवार यांच्या कार्यालयात आले होते. या बैठकीत त्यांनी आपल्या मोजक्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मतदान आणि पुढची व्यूहनिती या विषयी चर्चा केली.

या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींंनी मंत्री कपील पाटील यांच्याशी संवाद साधला.तुमच्या विजयात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा किती वाटा असेल, असा प्रश्न पत्रकारांनी कपील पाटील यांना करताच संतप्त स्वरात कपील पाटील यांनी,‘ ज्या माणसाने आपल्या विरोधात उघडपणे काम केले. तुतारी आणि इतरांची मतदान केंद्र परिसरात मंच लावण्यासाटी साहाय्य केले. त्या माणसाचा आपल्या विजय आणि मताधिक्यात काय संबंध असेल. आपण यामध्ये कोणाचेही नाव घेत नाही. त्यांचे नाव घेऊन आपण त्यांना नाहक मोठे पण करू इच्छित नाही,’ असे सांगून कपील पाटील यांनी कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदार संंघ निवडणुकीच्या वेळी मुरबाड मतदारसंघात काम केले नसल्याचे स्पष्ट केले. पाटील यांच्या या विधानावरून येत्या काळात पाटील, कथोरे वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली कंपनी स्फोटातील आरोपीला पोलीस कोठडी

मागील दोन वर्षापासून कपील पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ, ठाणे जिल्हा भाजप कार्यकारिणीतून कथोरे समर्थकांना डावलण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे नाराज झालेल्या कथोरे समर्थकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा वाद सुरू असताना पाटील यांच्याकडून कथोरे हे कुणबी समाजातील असल्याने आगरी, कुणबी वाद पेटवला. जागोजागी कथोरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न केले. कथोरे यांनीही शांत राहून प्रदेश नेत्यांना सुरू असलेल्या घटनांची माहिती देऊन भाजपचे कार्य सुरू ठेवले.

दरम्यानच्या काळात कथोरे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे पाटील यांचा राग अनावर झाला. तेव्हापासून ते कथोरे यांना जागोजागी पाण्यात पाहू लागले. पाटील, कथोरे वाद भाजपच्या मुळावर येईल म्हणून भाजप नेत्यांनी यात दिलजमाई करून हा विषय मिटवला. पण अंतर्गत धग कायम होती. लोकसभा निवडणूकीच्यावेळी कथोरे यांनी कपील पाटील यांच्या प्रचाराचे काम केले. कार्यकर्त्यांनी कथोरे यांना पाटील यांनी दिलेल्या त्रासाची माहिती असल्याने त्यांनी निवडणुकीत त्याचे उट्टे काढण्याची भाषा केली होती. कथोरे यांनी भाजप कार्यकर्त्यांना शांत करून समजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कपील पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडणूक आणण्याचे आणि मुरबाड मतदारसंघातून अधिकचे मताधिक्य देण्याचे आवाहन केले होते. कथोरे पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाले तरी त्यावर पाटील समाधानी नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.