डोंबिवली नागरिक सहकारी सोसायटी, डोंबिवली
tvlogसाठ ते सत्तरच्या दशकात शहरी भागात फ्लॅट संस्कृतीचा उदय होत असताना मुंबईतील अनेक चाकरमान्यांनी कल्याण-डोंबिवली शहरात तुलनेने कमी किमतीत मिळणाऱ्या घरांकडे आपला मोर्चा वळविला होता. त्या वेळी अर्थातच रेल्वे स्थानक परिसरात उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांना या ग्राहकांनी पसंती दिली. डोंबिवली नागरिक सहकारी सोसायटीतही अनेक कुटुंबे हे मुंबईतून स्थलांतर होऊन आले.  तेव्हापासून येथील रहिवासी शांतता आणि सौहार्दपूर्ण जीवन जगत आहेत.

रेल्वे स्थानक परिसर म्हटले की वाहतुकीची वर्दळ, फेरीवाल्यांचा गलबलाट, कर्णकर्कश आवाज हे ठरलेले. मात्र या वर्दळीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका वसाहतीत एरवी संपूर्ण डोंबिवलीत दुर्मिळ असणारी शांतता आढळते. अगदी प्रसन्न असल्यासारखे वाटते. सिमेंट क्राँक्रीटच्या जंगलातही निसर्गाचे सौंदर्य अबाधित राखत झाडांच्या सावलीत दिमाखात उभी असलेल्या या वसाहतीचे नाव आहे- डोंबिवली नागरिक सहकारी सोसायटी. डोंबिवलीतील जुन्या सोसायटय़ांपैकी एक असलेली ही सोसायटी १९७८ मध्ये नोंदणीकृत झाली.
साठ ते सत्तरच्या दशकात शहरी भागात फ्लॅट संस्कृतीचा उदय होत असताना मुंबईतील अनेक चाकरमान्यांनी कल्याण-डोंबिवली शहरात तुलनेने कमी किमतीत मिळणाऱ्या घरांकडे आपला मोर्चा वळविला होता. त्या वेळी अर्थातच रेल्वे स्थानक परिसरात उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांना या ग्राहकांनी पसंती दिली. डोंबिवली नागरिक सहकारी सोसायटीतही अनेक कुटुंबे हे मुंबईतून स्थलांतर होऊन आले. एैसपैस जागेत उभे असलेले हे संकुल ४ विंगचे असून त्यात ६३ सदनिका आहेत. या वसाहतीत साधारण ३०० ते ४०० नागरिक राहतात. उच्च मध्यमवर्गीय वर्गातील ही कुटुंबे येथील मोकळ्या वातावरणात रमले. सुरुवातीला सोसायटीत गणेशोत्सव, ध्वजवंदन आदी विविध सण साजरे केले जात होते. सदस्यांच्या खेळांचे सामने येथील मैदानात रंगत होते, असे सोसायटीचे सचिव राजन निकम सांगतात. सुरुवातीला कमी सदस्य असल्याने सगळे खेळीमेळीने एकत्र नांदायचे. २५ वर्षे सोसायटीमध्ये गणेशोत्सव सण साजरा केला गेला. मात्र त्यानंतर पुढची पिढी आली. शिक्षणासाठी अनेकजण बाहेरगावी गेले. नोकरी-व्यवसायात अनेकजण व्यस्त झाले. त्यामुळे सण उत्सव साजरे करणे जमेनासे झाले. काही नागरिक हे घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. घरात माणसांसोबतच त्यांच्या वाहनांची संख्या वाढत गेली आणि सोसायटीतील मैदानांची जागा वाहन पार्किंगने घेतली. त्यातही लहान मुलांसाठी काही जागा राखीव ठेवून तेथे पाळणा, घसरगुंडी अशी खेळणी ठेवलेली आहेत. आत्ताच्या मुलांना मैदानी खेळात जास्त रस नसल्याने हे खेळही जवळपास बंदच झाले.
स्वच्छता आणि शांततेसाठी नियम
सोसायटी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कमिटीने काही नियम घालून दिले आहेत. ते कठोर असले तरी सर्वानी त्यांचे पालन केले पाहिजे असा आमचा कटाक्ष राहतो, असे सदस्य वासंती भावे सांगतात. त्या म्हणाल्या, सोसायटी स्वच्छ राहावी म्हणून सोसायटीची गच्ची स्वत:च्या कार्यक्रमांसाठी वापरायला देणे आम्ही बंद केले. कुणाच्या घरी लग्नकार्य किंवा इतर समारंभ असला तरी सोसायटीच्या आवारात बँडबाजा वाजविण्यास मनाई आहे. यामुळे ध्वनिप्रदूषणासही अटकाव होईल व इतर नागरिकांनाही त्याचा त्रास जाणवणार नाही.
सोसयटीच्या आवारात भरपूर मोकळी जागा होती. तिथे सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्लॅन होता. मात्र वायुप्रदूषणाचा त्रास शहरात मोठय़ा प्रमाणात आहे. अशा वेळी नैसर्गिक सौंदर्य टिकून राहावे व सोसायटीचा परिसर हिरवागार दिसावा, यासाठी सोसायटीच्या चोहोबाजूंनी आम्ही अबोली, बहावा, कडुलिंब अशी विविध झाडे लावली. या झाडांना सुरुवातीला पाणी घालण्याचे काम आम्हीच करत असू. आता ही झाडे छान मोठी झाली असून उन्हाळ्यात त्यांच्या सावलीत मुले मैदानी खेळ खेळतात. विविध जातींचे पक्षी या झाडांवर विहार करतात. सकाळ-संध्याकाळ त्यांचे मंजूळ स्वर कानी पडले की मन प्रसन्न होते.
रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हे संकुल असल्याने स्थानक परिसरातील आरोग्य सुविधा, शाळा यांचा लाभ येथील नागरिकांना घेता आला. उच्च मध्यमवर्गीय घरातील नागरिक असल्याने खाजगी डॉक्टर, शाळांकडे त्यांचा नेहमी कल राहिला. यामुळे सरकारी दवाखाना किंवा शाळांची कमतरता भासली नाही. पाण्याचीही समस्या तशी फार मोठी नाही. सकाळी ६ ते १० या वेळेत पाणी सोडण्यात येते. दोन वेळेस पाणी सोडण्याऐवजी सकाळी एकदाच पाणी सोडण्यात येते.
सोसायटी जुनी झाल्याने सध्या इमारतींच्या देखभालीचा खर्च वाढत आहे. पावसाळ्यात गच्ची गळू लागल्याने त्यावर पत्रे टाकून घेतले आहेत. पर्जन्य जलसंचय योजना राबविण्याचा विचार आहे. मात्र अद्याप तो प्रत्यक्षात अमलात आलेला नाही. पावसाळ्यात सोसायटीच्या आवारात मोठय़ा प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे सर्वत्र पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून त्यावर साचलेले पाणी पंपाच्या साहाय्याने एका टाकीत सोडण्यात येते. या पाण्याचा सध्या वापर होत नाही. मात्र भविष्यात प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची योजना विचाराधीन असल्याचे सदस्यांनी सांगितले.
महात्मा फुले रोडवरील या सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरच चौक आहे. तसेच आजूबाजूला शाळा असल्याने दुपारी तसेच संध्याकाळी वाहतूक कोंडीचा त्रास जाणवतो. या वाहनांच्या ध्वनी व वायुप्रदूषणाने येथील रहिवासी हैराण आहेत. तसेच फेरीवाल्यांनी सोसायटीच्या बाहेरील पदपथाचा संपूर्ण परिसर व्यापला आहे.  येथे भर रस्त्यात सार्वजनिक कार्यक्रमांचे मांडव टाकले जातात. सार्वजनिक पूजा असो वा वह्य़ा वाटप, त्या कार्यक्रमाचा सोसायटीच्या रहिवाशांना नाहक त्रास सोसावा लागतो. सोसायटीपासून काही अंतरावर प्रशस्त असे भागशाळा मैदान आहे. परंतु या मैदानाचा वापरही खेळांऐवजी  कार्यक्रमांसाठी जास्त केला जातो. सतत तेथे काही ना काही कार्यक्रम राबविले जातात. कार्यक्रमाच्या जोखडातून या मैदानाची सुटका करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. या भागात कायम विजेचा लंपडाव सुरू असतो. पावसात ही समस्या डोके वर काढते.
डोंबिवली पूर्वेचा ज्या पद्धतीने विकास झाला तसा पश्चिमेचा अद्याप झालेला दिसत नाही.  मात्र ‘डोंबिवली नागरिक..’सारख्या काही सोसायटय़ांनी या भागाची शान राखली आहे.