नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडून आयुक्तांना चौकशीचे आदेश
कल्याणमधील मौजे चिकणघर येथील ७३ हजार चौरस मीटरच्या ‘विकास हक्क हस्तांतरण’ (टीडीआर) घोटाळ्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांना तात्काळ ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहेत. १२४ कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे शासनाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.
सोनवणे हे गेल्या नऊ महिन्यापासून महापालिकेच्या तसेच शासनाच्या सेवेत नाहीत. त्यांना शासनाने अद्याप कोठेही पदभार दिलेला नाही. त्यामुळे सोनवणे हे सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत तसेच ते नक्की कोठे आहेत, असे प्रश्न काही दक्ष नागरिकांनी शासनाकडे केले होते. त्याची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली जात होती. नगरविकास विभागाने शुक्रवारी पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना पाठविलेल्या पत्रात रामनाथ सोनवणे हे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आस्थापनेवरील स्थानापन्न ‘उपायुक्त’ संवर्गातील अधिकारी आहेत. त्यामुळे चिकणघर येथील ‘टीडीआर’ घोटाळ्याची चौकशी आयुक्तांनी करावी, असे स्पष्ट केले आहे. नगरविकास विभागाच्या या पत्रामुळे सोनवणे हे उपायुक्त संवर्गात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनवणे यांनी मागील अनेक वर्ष उल्हासनगर, जळगाव, कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त म्हणून काम केले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेतून उचलबांगडी झाल्यापासून शासनाने त्यांना अद्याप कोठेही नियुक्ती दिलेली नाही.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कल्याणमधील ‘टीडीआर’ घोटाळाप्रकरणी सोनवणे यांची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले होते. एक महिना उलटला तरी नगरविकास विभागाकडून सोनवणे यांची चौकशी करण्यात येत नसल्याने टीडीआर घोटाळा प्रकरणातील तक्रारदार अ‍ॅड.अनिल परब यांनी शासन सोनवणे यांना अभय देण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी तक्रार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे केली होती.
‘टीडीआर’ प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने नगरविकास विभागाने उपायुक्त सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे व त्यांची विभागीय चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी, असे आदेश दोन दिवसापूर्वी दिले आहेत. सोनवणे यांची चौकशी केल्यानंतर सविस्तर चौकशी अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घोटाळ्यात महापालिकेच्या नगररचना विभागातील तत्कालीन साहाय्यक संचालक नगररचनाकार चंद्र प्रकाश सिंह, नगररचनाकार रघुवीर शेळके, उपअभियंता शशीम केदार यांचा सहभाग असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे व त्यांची चौकशी करण्याचे आदेश शासनाने प्रशासनाला यापूर्वीच दिले आहेत.

काय आहे घोटाळा?
मौजे चिकणघर येथील ७३ हजार चौरस मीटरचा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आला नाही. या भूखंडावर अतिक्रमणे आहेत. शेती केली जाते. शासनाची काही आरक्षणे आहेत. तरीही पालिका अधिकाऱ्यांनी विकासकांशी साटेलोटे करून या जमिनीवरील टीडीआर वाटप करून पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याची अ‍ॅड. परब यांची तक्रार आहे.
चिकणघर येथील टीडीआरप्रकरणी रामनाथ सोनवणे यांची चौकशी करण्याबाबत नगरविकास विभागाकडून पालिकेला आदेश प्राप्त झाले आहेत. आयुक्तांच्या आदेशावरून याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
-दीपक पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन
कडोंमपा