भाईंदर : भाईंदर पश्चिम परिसरातील मॅक्सस मॉल परिसरात रस्ता डांबरीकरण काम चक्क भर पावसात करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा रस्ता पुन्हा किती काळ टिकेल यांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या अनेक भागात खचलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता प्रशासनाकडून कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येत आहे. या कामादरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कामदेखील करण्यात येत आहे. परंतु बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या दुर्लक्षामुळे निष्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे अनेक वेळा उघडकीस आले आहे. तसेच कंत्राटदाराच्या आर्थिक सोयीकरिता रस्त्याची  कामे वारंवार करण्यात येत असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांंकडून करण्यात येतो.

भाईंदर पश्चिम परिसरातील मॅक्सस मॉल भागात वाहनांची मोठय़ा प्रमाणात रहदारी असते. परंतु या भागात खड्डय़ाचे साम्राज्य निर्माण झाले असल्यामुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले होते. याकरिता पालिका प्रशासनाकडून डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते, परंतु हे काम चक्क भर पावसात करण्यात येत असल्याचे दिसून आले. बांधकाम नियमानुसार भर पावसात केलेले काम अधिक काळ टिकत नसून ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. परंतु या सर्व नियमांना पाठीशी घालत डांबरीकरण करण्यात येत असल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.

तो परीसर सुका होता. त्यामुळे त्यावर डांबरीकरण करण्यात आले तर बाकी सर्व सामुग्री पुन्हा पाठवण्यात आली.

– सतीश तांडेल, कनिष्ठ अभियंता, मीरा-भाईंदर महानगरपालिका