नाल्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचा रहिवासी, राजकीय पक्षांचा आरोप
महापालिका म्हणते, रेल्वेचा जिनाच अनधिकृत; रेल्वे प्रशासनाचे मात्र मौन
प्रवाशांच्या गर्दीमुळे मंगळवारी सकाळी वसई रेल्वे स्थानकाजवळील नाल्याचा स्लॅब कोसळून २५ प्रवासी नाल्यात पडले. या दुर्घटनेनंतर वसईत ‘स्लॅब’वाद सुरू झाला आहे. नाल्याचे बांधकाम निकृष्ट होते, असा आरोप रहिवासी आणि राजकीय पक्षांकडून करण्यात आला. मात्र पालिकेने हा आरोप फेटाळून लावत रेल्वेवरच या प्रकरणाचे खापर फोडले आहे. ‘पालिकेच्या सर्व नाल्यांचे बांधकाम मजबूत असून रेल्वेचा जिनाच अनधिकृत आहे,’ असा आरोप महापालिका प्रशासनाने केला आहे. रेल्वेने मात्र याप्रकरणी मौन बाळगले आहे.
मंगळवारची सकाळी वसईहून लोकल पकडणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी जीवघेणा अनुभव देणारी ठरली. वसई पश्चिमेच्या आनंदनगर भागात प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे. या प्लॅटफॉर्मवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुटत असतात. ज्या वेळी लोकल येते त्या वेळी येथे खूप गर्दी असते. मंगळवारी सकाळी लोकल पकडण्यासाठी प्रवासी जमू लागले. परंतु पश्चिम रेल्वेच्या गोंधळामुळे लोकल रद्द झाली. प्रवासी प्लॅटफॉर्मवर खोळंबून होते. तिथे जागा कमी असल्याने प्लॅटफॉर्मच्या खाली उभे होते. त्यातच ८ वाजून ४० मिनिटांनी सुटणाऱ्या दुसऱ्या लोकलसाठी प्रवासी येऊ लागले. त्यामुळे गर्दी वाढली. या ठिकाणी पालिकेचा जुना नाला आहे. त्या नाल्याच्या स्लॅबवरून जाणारा छोटा जिना प्लॅटफॉर्मवर जातो. रेल्वेने हा जिना थेट नाल्याच्या स्लॅबवर उतरवला होता. त्या स्लॅबवर अचानक प्रवाशांची गर्दी वाढली आणि तो कोसळला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे हाहाकार उडाला. प्रवासी नाल्यात कोसळले आणि जखमी झाले.
या दुर्घटनेला जबाबदार कोण? याविषयी चर्चा रंगली आहे. विरोधी पक्षांनी महापालिकेला लक्ष्य केले आहे. नाल्याच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी केला. काँग्रेसचे प्रदेश सचिव दत्ता नर यांनीही नाल्याच्या निकृष्ट बांधकामावर टीका केली आहे.

रेल्वेचा जिना बेकायदा
रेल्वे स्थानकाजवळील नाला महापालिकेने बांधला असला तरी तो १५ वष्रे जुना आहे. तो पादचाऱ्यांना चालण्यासाठी बनवलेला नव्हता. त्यावर असलेले झाकण फक्त दरुगधी पसरू नये यासाठी होते. रेल्वेने आमची कुठलीही परवानगी न घेता या नाल्यावर जिना बांधला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेची भेट घेतली. रेल्वेने तुटलेल्या नाल्यावरील स्लॅब बांधून देण्याचे कबूल केले आहे. शहरातील नाले किंवा अन्य कुठल्याही बांधकामाबाबत तडजोड केली जाणार नाही. जर कुठे निकृष्ट बांधकाम आढळले, तर गय केली जाणार नाही. – सतीश लोखंडे, महापालिका आयुक्त

पालिका आणि रेल्वेच्या कामांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. या दोघांमध्ये समन्वय नसल्याने कामात त्रुटी राहात असतात. या दुर्घटनेपासून दोघांनी बोध घेऊन समन्वयाने काम केले तर भविष्यातील दुर्घटना टळतील.
– शेखर धुरी, डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सन्टेटिव्ह कमिटी

नेमके काय झाले ते आम्हाला समजलेच नाही, पण एकच आरडाओरड आणि गोंधळ सुरू झाला. जे प्रवासी आत पडले ते पूर्ण भेदरलेले होते. गटाराच्या पाण्यात पूर्णपणे माखले होते. त्यांचे सामान, मोबाइल गटारात पडले होते. स्थानिक रहिवासी, पालिका कर्मचाऱ्यांनी मदत केली, पण रेल्वे प्रवासी अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
– संदीप राणे, प्रवासी

गाडीची वाट पाहात आम्ही खाली सावलीत उभे होतो. गाडी येईल म्हणून आम्ही जिना चढायला गेलो असतानाच हा स्लॅब कोसळला आणि आम्ही नाल्यात पडलो. एकूण २३ ते २५ जण एकाच वेळी पडलो. इतर प्रवाशांनी आम्हाला बाहेर काढले.
– जिग्नेश नायर, जखमी प्रवासी.