पालिकेतर्फे आरोग्य वाडिया रुग्णालयात सुविधा
कर्करोगा सारख्या गंभीर आजारांच्या निदानासाठी ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना खासगी रुग्णालये अथवा मुंबईच्या टाटा रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. त्यातही शहरातील गरीब वस्त्यांमधील ७ ते १० टक्के महिलांमध्ये स्तनाचा वा सव्‍‌र्हायकल कर्करोग होण्याचे प्रमाण आढळून आल्याने महापालिकेने ठाण्यातच कर्करोग निदान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील वाडिया रुग्णालयात स्तनांच्या कर्करोगाचे निदान करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना किमान प्राथमिक स्तरावर कर्करोगाचे निदान आणि उपचार शहरातच वाजवी दरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत १२ ते १३ लाख महिला लोकसंख्या आहे. शहरातील मोठी लोकसंख्या झोपडपट्टय़ा, चाळी अशा वस्त्यांमध्ये विखुरली गेली आहे. या वस्त्यांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार येथील तीन टक्के महिलांना स्तनाचा कर्करोग, तर १० टक्क्यांहून अधिक महिलांना सव्‍‌र्हायकल कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कर्करोगाचे निदान करणारी आधुनिक यंत्रणा नाही. त्यामुळे रुग्णांना महागडय़ा खासगी रुग्णालयांत किंवा मुंबईतील टाटा रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने ७६ लाख रुपये खर्चून कर्करोगाचे निदान करणारी यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे शहरातील पुढील ५ वर्षांत ५ लाख महिलांची कर्करोग तपासणी करणे, पॅथॉलॉजिकल, मायक्रोबायोलॉजिकल, विविध रक्त तपासण्या, बायोप्सी, डी.एन.ए. तपासणी करणे, आर.एन.ए. तपासणी करणे यासाठी या यंत्रणेचा वापर करता येऊ शकतो. यासाठी या दोन उपकरणांची खरेदी असल्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून सादर करण्यात आला आहे. कर्करोगाचे निदान झाल्यावर तत्काळ उपचार करणे शक्य होते, असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.