सायलेन्सर बसवून देणाऱ्या वाहन दुरुस्ती दुकानदारांवर कारवाई करणार

ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दुचाकींना कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवून देणाऱ्या वाहन दुरुस्ती दुकान मालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

ज्या दुकानात किंवा गॅरेजमध्ये अशा प्रकारच्या कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसविण्यात येतात अशा ठिकाणांचा शोध पोलिसांनी सुरू केला असून त्यापैकी काहींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मध्यंतरी कल्याण-डोंबिवली परिसरात अशी वाहने अडवून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून त्यांचा चक्काचूर करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. ही मोहीम येत्या काळात संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात राबवली जाणार असून दंडात्मक कारवाई तसेच दुकानात असलेले सायलेन्सरही नष्ट केले जाणार आहे.

दुचाकी चालक त्यांच्या दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करत असतात. त्यामुळे दुचाकीतून मोठा आवाज येत असतो. तसेच ध्वनिप्रदूषणही होत असते. त्याचा त्रास वृद्ध तसेच बालकांना होत असतो. या आवाजामुळे काही वृद्ध नागरिकांनी ठाणे वाहतूक पोलिसांना प्रत्यक्ष भेटून कान आणि निद्रानाश होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. तर काही लहान मुलांच्या पालकांनीही समाजमाध्यमे आणि वाहतूक पोलिसांच्या ई-मेलवर आवाजामुळे बालके घाबरत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी या तक्रारींची दखल घेतली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अशा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १५ ते २१ जून या कालावधीत ठाणे पोलिसांनी अशा वाहनांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. वाहतूक शाखेने ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या क्षेत्रात २३५ वाहनचालकांचे सायलेन्सर काढून ते नष्ट केले आहेत. तसेच ज्या वाहन दुरुस्ती दुकानांमध्ये हे सायलेन्सर बसविण्यात आले आहेत. त्या दुकान मालकांना ठाणे पोलीस नोटिसा बजावण्यास सुरुवात करणार आहे. त्यांच्याविरोधात दंड आकारण्यात येणार असून दुकानात अशा प्रकारचे सायलेन्सर आढळल्यास ते नष्ट केले.

सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजांमुळे नागरिकांना त्रास होत होता. त्या संदर्भात तक्रारीही नागरिकांनी आमच्याकडे केल्या होत्या. नष्ट केलेल्या प्रत्येक सायलेन्सरची किंमत १५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असावी. त्यामुळे दुचाकी चालक पुन्हा असे सायलेन्सर बसवून नियमांचे उल्लंघन करणार नाहीत. तसेच वाहन दुरुस्ती करणाऱ्या दुकान मालकांनाही आम्ही नोटिसा बजावणार आहोत.

–  बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे