मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : लाल रंगाचे गुलाब हे प्रेमाचे प्रतिक. १४ फेब्रुवारी या जागतिक प्रेमदिनी गुलाब फुलांचे महत्त्व अधिकच असते. मात्र हे फुल कोमेजून जाऊ नये यासाठी यंदा बाजारात चिनी बनावटीचे नकली गुलाब आले आहेत. कबुतराच्या पिसांपासून तयार केलेले आणि  बॅटरीवर चालणारे प्रकाशाचे गुलाब सध्या तरुणाईला आकर्षित करत आहेत. दुसरीकडे करोना विषाणूमुळे चीनी वस्तू घेण्याकडे ग्राहक कचरत आहेत.

१४ फेब्रुवारी जागतिक प्रेमदिन अर्थात  ‘व्हॅलंटाईन डे’ साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. त्यासाठी बाजारात विविध आकर्षक वस्तू आल्या आहेत. प्रिय व्यक्तीला काय भेटवस्तू द्याव्या, याचा विचार करत तरुणाई बाजार पालथा घालत आहेत, तसेच ऑनलाइन वस्तू मागवत आहेत. भेटवस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये अनेक आकर्षक वस्तू खुणावत आहेत.

चिनी बनावटीच्या गुलाबाचे दोन प्रकार आहे. एक गुलाब कबुतराच्या पिसांपासून बनवलेले तर दुसरे गुलाब प्लास्टिकचे आहेत. त्यात बॅटरीवर चालणारे दिवे आहेत. दोन्ही गुलाब हुबेहुब दिसत असल्याने ते घेण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत. या बनावटी गुलाबांची किंमतही खिशाला परवडणारी आहे.

सध्या विविध वस्तू बाजारात तसेच ऑनलाइन बाजारात आहे. त्यात तोचतोच पणा असतो.

त्यामुळे त्यात वेगळेपणा दिसण्यासाठी या वस्तूंवर छायाचित्रे लावून भेट देण्यात येतात. त्याचा कल यंदाही वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कप, उशी आदींवर शंभर ते दीड हजार रुपयांपर्यंत स्वत:चे छायाचित्र छापून करून मिळत आहे. ई-कॉमर्सची अनेक संकेतस्थळे विविध आकर्षक वस्तू सवलतींच्या दरात विकत आहेत. त्या वस्तू ऑनलाइन मागविण्याकडे तरुणाईचा कल आहे.

‘करोना विषाणू’ची भीती कायम

चीनमधील वुहान येथे फैलावलेल्या करोना विषाणूचे भय जगभरात पसरत असताना त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेतील चीन वस्तूंवर झाला आहे. ‘करोना  विषाणू’ची भीती व्हॅलेंटाईनच्या खेरदीवर दिसून येत आहे. चिनी बनवाटीच्या वस्तू कशा घ्याव्यात, असा विचार करत आहेत. त्यामुळे ग्राहक कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र चीनी वस्तू भारतात येण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. सध्या आलेल्या वस्तू या तीन महिन्यांपूर्वीच बाजारात आलेल्या आहेत.