ठाणे : मुस्लिम मतांमधील फूट टाळण्यासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी भिवंडी लोकसभेच्या निवडणूकीतून माघार घेत असल्याचे एमआयएमच्या उमेदवाराने जाहीर केले. तसेच त्यांनी समर्थकांसह शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर एमआयएमच्या दुसऱ्या गटाने अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एमआयएमच्या या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
भिवंडी लोकसभेत महायुतीकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे अशी तिरंगी लढत आहे. भिवंडी शहरात मुस्लिम मतदार मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामुळे एमआयएम पक्षाने अक्रम खान यांना उमेदवारी दिली होती. एमआयएम पक्षाकडून त्यांनी अधिकृत उमेदवाराचा अर्ज सादर केला. पंरतु मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना त्यांनी प्रचारातून माघार घेत निवडणूक लढत नसल्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएम पक्षाने निवडणूक लढल्यास मुस्लिम मतांची विभागणी होईल त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक प्रचार थांबवून बाळ्या मामा यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांच्या गटाने जाहीर केले. तर दुसऱ्या एका गटाने निलेश सांबरे यांना पाठिंबा दर्शविला आहे. आमचा पाठिंबा अधिकृत असून निलेश सांबरे यांना एमआयएम पाठिंबा देणार असल्याचे एमआयएमचे सरचिटणीस अमोल कांबळे यांनी सांगितले. एमआयएमच्या या भूमिकांमुळे त्यांचे समर्थक कोड्यात पडले आहे.