मुंब्रा येथील ख्रिश्चन समाजासाठी असलेल्या दफणभूमीची दुरवस्था झाली असून या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘ख्रिश्चन एकता मंच’तर्फे सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत कब्रस्तानमध्ये तातडीने सुविधा पुरविण्याची मागणी केली.  मुंब्रा, दिवा, कळवा, डायघर आदी भागांत ख्रिस्ती समाज राहत असून या समाजासाठी स्वतंत्र दफणभूमीची सुविधा उपलब्ध नाही. मुंब्रा अग्निशमन दलाच्या पाठीमागे ख्रिस्ती आणि बौद्ध समाजाकरिता एकच अंत्यसंस्काराची जागा बांधून देण्यात आली आहे. मात्र, एकच जागा असल्यामुळे दोन्ही धर्मामध्ये वाद किंवा तेढ निर्माण होऊ नये वेगळी दफणभूमी देण्याची मागणी ख्रिस्ती समाजामार्फत करण्यात येत आहे. यासंबंधी गेल्या वर्षभरापासून महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याच पाश्र्वभूमीवर सोमवारी मोर्चा काढण्यात आला, अशी माहिती ख्रिश्चन एकता मंचचे अध्यक्ष जितू राठोड यांनी दिली.