दादरमधील शिवाजी पार्क मैदानात नियोजित दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी नाकारणारा मुंबई महापालिकेचा निर्णय अयोग्य असल्याची टिप्पणी करत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय दिला. मुंबई महानगरपालिकेचा या मेळाव्याला परवानगी न देण्याचा निर्णय हा कायदेशीर प्रक्रियेचा उघडउघड दुरुपयोग असल्याचं निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी दिली. यानंतर ठाकरे गट समर्थकांनी मुंबईबरोबरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला. अशातच रात्री उशीरा ठाण्यामधून मुंबईच्या दिशेने रवाना होण्याआधी शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी या घडामोडींसंदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री शिंदेंनी शिवाजी पार्कवर मेळावा घेतला असता तर…”; ठाकरेंना परवानगी मिळाल्यावर शिंदे गटाकडून दावा

मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गट आणि ठाकरे गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या शिवाजी पार्कच्या याचिकेवर शुक्रवारी दुपारी निर्णय दिला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवारांपासून ते शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या अनेक आमदार, खासदार पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया नोंदवल्या. मात्र या साऱ्यापासून मुख्यमंत्री शिंदे अलिप्त होते. रात्री उशीरा शिंदे ठाण्यामधून मुंबईच्या दिशेला रवाना होत असताना त्यांकडे पत्रकारांनी बोलण्याबाबत विचारले.

नक्की वाचा >> दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंना परवानगी मिळाल्यानंतर सुषमा अंधारेंचा CM शिंदेंना टोला; म्हणाल्या, “खरा शिवसैनिक सुरतला पळून…”

मुख्यमंत्री शिंदे गाडीमध्ये बसण्यासाठी गेटमधून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी, “सर बोलणार?” असा प्रश्न विचारला. सुरक्षारक्षकांच्या कवच आजूबाजूला असलेल्या शिंदे यांनी हातवारे करत, “नाही, प्रवक्ते बोलतील” असं तीन शब्दांमध्ये उत्तर दिलं. त्यावर पत्रकारांनी “ओके, ओके” असं उत्तर दिलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी बराच वेळ बंगल्याच्या बाहेर उभ्या असणाऱ्या ओळखीच्या पत्रकारांशी बोलताना “तुम्ही आतमध्ये का आला नाहीत?” असा प्रश्न विचारला.

पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता मुख्यमंत्री शिंदे ठाण्याहून मुंबईला रवाना झाले.