निवडणुका आल्या की विकासकामे होतात, हे भारतीय लोकशाहीतील कटू सत्य आहे. अंबरनाथ, बदलापूरमधील रहिवासीही सध्या याचा अनुभव घेत आहेत. दोन महिन्यांनंतर या दोनही शहरांच्या नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने लोकप्रतिनिधींनी जोमाने कामे करण्यास सुरुवात केली आहे.  या शहरांमधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिीटीकरण करण्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. मात्र गेली साडे चार वष्रे झोपलेल्या नगरपालिकेने आता शहरांत एकाच वेळी खोदकाम सुरू केले आहे.
अं बरनाथ आणि बदलापूर या शहरांचा वाढता पसारा तेथील उपलब्ध संसाधनांवर सध्या ताण देत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, रेल्वे समस्या, रस्ते हे या उपनगरांमध्ये हमखास चर्चेचे विषय झाले आहेत. याची जाण येथील लोकप्रतिनिधींना असली तरी त्यांना या प्रश्नांवर काम करण्यासाठी एकच वेळ योग्य वाटते. ती म्हणजे निवडणुकांचे पडघम वाजू लागण्याची वेळ. हीच वेळ सध्या या दोन्ही शहरांमध्ये आली असून एप्रिल महिन्यात अंबरनाथ व बदलापूर पालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये सध्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामांनी वेग पकडला आहे. त्यात अंबरनाथने आघाडी घेतली असून बदलापूरने अंबरनाथच्या पावलावर पाऊल टाकले आहे. अंबरनाथ नगरपालिकेने स्वत:च्या निधीतून ६० कोटींची रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे मंजूर केली असून काँक्रीटीकरणाची कामे मंजूर करणारी ती राज्यातील पहिली नगरपालिका आहे. या निधीमध्ये शहरातील १४.५४ किमीची कामे करण्यात येणार आहेत. अंबरनाथ पालिकेचा जवळपास ९० कोटी रुपयांचा रस्ते काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. मात्र गेली साडेचार वर्षे कोणतीही कामे न करता पालिकेने एकत्रच संपूर्ण शहरात खोदकाम केल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. वडवली, हुतात्मा चौक या भागात ही कामे सुरू आहेत. तसेच शहरात भुयारी गटार योजनेचीही कामे सुरू असल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. या विकासकामांचा अंबरनाथकरांना निश्चितच फायदा होणार असला तरी, एकत्रच कामे सुरू झाल्याने विकासकामांमुळेच कोंडी निर्माण झाल्याचे चित्र संपूर्ण शहरभर दिसत आहे.
गेली चार वर्षे प्रत्येक प्रभागात कोणतीच विशेष कामे न झाल्याने आता निवडणुकांच्या तोंडावर आपापल्या प्रभागात काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून विकासकामे सुरू असल्याचे नागरिकांना दाखवून प्रत्येक प्रभागातील नगरसेवक मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांपुढे जाणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये अगदीच काठावर विजय मिळवलेल्या शिवसेनेने निकालानंतर नगरपालिका निवडणुकांसाठी मतदारांपुढे प्रतिमा सुधारण्याचा काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. मात्र अतिशय झटपट पद्धतीने ही कामे सुरू असल्याने कामांच्या दर्जाबद्दलही शंका उत्पन्न होत असून नागरिकांच्या तक्रारीवरून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे एक पथक या कामांची पाहणी करून गेले. ते एमएमआरडीएकडे या कामांच्या दर्जाबाबतचा अहवाल सादर करणार आहेत. तसेच पालिकेतील अभियंते अंबरनाथमधील १४.५४ किमीपैकी ६.९५ किमीचे रस्ते पूर्ण झाल्याची ग्वाही देत असून या पूर्ण रस्त्यांची यादी देण्याबाबत मात्र का-कू करत आहेत. दरम्यान अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी ही कामे पूर्व नियोजित असून स्वनिधी व कोणत्याही कर्जाशिवाय अंबरनाथ पालिका ही कामे करत आहे. तसेच संबंधित ठेकेदार पाच वर्षे या रस्त्यांची काळजी घेणार असून शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामेही करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बदलापूर पालिका क्षेत्रातही सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांनी वेग पकडला असून, येथे ५५ कोटींची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे शासनाच्या निधीतून मंजूर झाली आहेत. यातून शहरातील प्रमुख दहा रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. हे रस्ते शहरातील अत्यंत गजबजलेले रस्ते असून पूर्व व पश्चिम भागातील रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण करताना नगरपालिकेची तारांबळ उडणार असून सध्या मोहनानंदनगर व नगरपरिषद ते एमआयडीसीकडील रस्ता या परिसरात सुरू झालेल्या काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील कामे सुरू करताना पर्यायी रस्ते उपलब्ध न झाल्यास बदलापुरातील नागरिकांची कोंडी होणार आहे. गेल्या वर्षभरापासून भुयारी गटारकामांच्या खोदकामांमुळे येथील नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावरच रस्ते काँक्रीटीकरण सुरू झाल्याने नागरिक त्याचा राजकीय अर्थ काढत आहेत. अंबरनाथप्रमाणेच येथील कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र ही कामे निकृष्ट नसून चांगल्या दर्जाची असल्याची माहिती बदलापूर पालिकेच्या नगर अभियंत्यांनी दिली आहे. अर्थात बदलापूरकर सुज्ञ असून निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेल्या या कामांचा नेमका अर्थ आता त्यांनाही उमगला आहे. तसेच  केंद्रात व राज्यात १० वर्षांपासून अधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारांना जनतेने घरचा रस्ता दाखवला. सत्ता परिवर्तन झाले. मात्र या दोन्ही शहरांमध्ये तर गेली १५ वर्षे सेना-भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांच्या अवनीतीस केवळ काँग्रेस शासनाच्या नावे बोटे मोडून भागणार नाही. इथे मतांचा जोगवा मागताना विकासकामांचा पाढाच वाचावा लागणार आहे.