scorecardresearch

सावरकर नगर भागातील रस्त्याच्या कामामुळे कोंडी

वागळे इस्टेट येथील सावरकर नगर भागातील रस्त्यावरील धोकादायक कल्व्हर्टच्या पुनर्बाधणीचे काम सुरू असल्यामुळे एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे.

ठाणे : वागळे इस्टेट येथील सावरकर नगर भागातील रस्त्यावरील धोकादायक कल्व्हर्टच्या पुनर्बाधणीचे काम सुरू असल्यामुळे एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे. परिणामी, मागील काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळी या चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वागळे इस्टेट भागातील लोकमान्य नगर, यशोधन नगर, सावरकर नगर, इंदिरा नगर परिसरातून मोठय़ा संख्येने नागरिक स्थानक परिसराकडे किंवा इतर ठिकाणी प्रवास करतात. लोकमान्य नगर भागात ठाणे परिवहन सेवेचे बस आगार असून येथून विविध मार्गावर बस सोडण्यात येतात. त्यामुळे या मार्गावर सकाळ-संध्याकाळ वाहनांची वर्दळ असते. काही महिन्यांपूर्वी कामगार रुग्णालयापासून सावरकर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कल्व्हर्ट धोकादायक झाल्यामुळे पुनर्बाधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरुवातीला या कामामुळे सावरकर नगरहून यशोधन नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

येथील वाहतूक इंदिरा नगरमार्गे वळविण्यात आली होती. रस्त्याचे एका बाजूचे काम पूर्ण झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करून या एकाच मार्गिकेवरून दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. या वाहतूक कोंडीत शेअिरग रिक्षाचालक अडकत असल्यामुळे सायंकाळच्या वेळी स्थानक परिसरातून नागरिकांना रिक्षा मिळणे कठीण होत आहे.

लोकमान्य नगर तसेच यशोधन नगरकडे येण्यासाठी नागरिकांना रिक्षाच्या रांगेत बराच काळ उभे राहावे लागत आहे. रिक्षाच्या रांगेत वेळ खर्ची पडल्यानंतर पुढे कामगार नाक्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीत बराच काळ अडकावे लागत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानक परिसरातून अनेकदा रिक्षा चालक सायंकाळी उशिरा या ठिकाणी येण्यास नागरिकांना नकार देतात. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडू लागली आहे.

सावरकर नगर भागातील रस्त्याच्या कामामुळे सायंकाळच्या वेळी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. परंतु, या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये याकडे वाहतूक विभागाचे लक्ष आहे. 

– चेतना चौधरी. पोलीस निरीक्षक, वागळे वाहतूक विभाग.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congestion road works area road dangerous way transportation ysh