बाटल्यांमध्ये विहिरीचे पाणी भरून ‘शुद्ध’ पाण्याची विक्री
किमान पिण्याचे पाणी शुद्ध असावे या हेतूने बाटलीबंद पाणी घेत असाल तर सावधान! वसई-विरारमध्ये बाटलीबंद (मिनरल वॉटर)चा धंदा जोरात सुरू आहे, परंतु या बाटलीबंद पाण्यात शुद्ध मिनरल पाणी देण्याऐवजी विहिरीतले पाणी भरून विकले जात आहे.
वसई-विरार शहरात सध्या पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे लोकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो. टँकरचे दूषित पाणी पिण्यापेक्षा महागडे बाटलीबंद पाणी पिण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. लोकांच्या या गरजेचा फायदा उचलून अनेक बोगस कंपन्यांनी शुद्ध पाणी पुरविण्याचा धंदा सुरू केलेला आहे. त्यांच्याकडून पाच लिटर ते वीस लिटपर्यंतच्या मोठय़ा पाण्याच्या बाटल्या लोक विकत घेऊन पाणी पीत असतात, परंतु या कंपन्या कोणत्या आहेत, त्याचे पाणी कुठून येते याची लोकांना माहिती नसते. वसईच्या पूर्व पट्टीवरील महामार्गावर अशा बोगस कंपन्यांनी हा धंदा सुरू केला असून चक्क विहिरीचे पाणी थेट बाटल्यात भरले जाते. राजरोसपणे हा धंदा सुरू आहे. मुळात पूर्व पट्टीतल्या गावांमधील विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यातील क्षाराचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या पाण्यात असणाऱ्या विविध घटकामुळे आरोग्यास अपाय होऊ शकतो. एएफपीआरओ आणि ग्राऊंड वॉटर सव्र्हे डेव्हलपमेंट या केंद्राच्या अखत्यारीतील दोन संस्थांनी वसईतल्या विहिरींचे सर्वेक्षण करून तेथीेल पाण्याचे पृथक्करण केले होते. पिण्याच्या पाण्यातले जडत्व तीनशे युनिटसपर्यंत असले तर चालू शकते. परंतु येथील विहिरींच्या पाण्याचे जडत्व सहाशे ते दोन हजार युनिटपर्यंत आहे. मुळात मिनरल वॉटर म्हणजे प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी असावे लागते. परंतु या कंपन्या केवळ लेबल लावून ते विकत असतात. असे अशुद्ध पाणी वसई-विरार परिसरात विकले जाते. केवळ बाटलीबंद शुद्ध पाणी असा समज असल्याने लोक हे पाणी पीत असतात. या धंद्यात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. वसई पश्चिमेच्या सत्पाळा गावात असलेल्या एका विहिरीतून अशाच पद्धतीने बाटलीबंद पाण्याचे केंद्र सुरू असल्याचे मनसेने उघडकीस आणले होते. अशा पद्धतीेने पाणी विकले जात असेल त्यावर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन तसेच वजन व मापे नियंत्रक खात्याकडे असते. पाण्याची शुद्धता तपासण्याचे काम त्यांनी करायचे असते. पण त्यांच्या दुर्लक्षामुळे हा धंदा राजरोस सुरू आहे. दररोज हजारो लिटर विहिरीतून असा पाणी उपसा होत असल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होत आहे.