|| पूर्वा साडविलकर

तुटवड्यामुळे जिल्ह्यातील अनेक केंद्रे बंद; साठा मिळवण्यासाठी प्रशासनाची रोजची धावाधाव

ठाणे : येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, सध्या सुरू असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा गोंधळच निस्तरता नको झाला आहे. लशींच्या मर्यादित साठ्यामुळे करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय येत आहे. गेल्या पंधरवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील ५० टक्क्यांहून अधिक केंद्रांवर रडतखडत लसीकरण सुरू आहे. अनेक केंद्रांवरील मोहीम पूर्णपणे थांबवण्याची वेळ आली आहे. लशींचा साठा कधी येणार, किती मिळणार याबाबतही स्पष्टता नसल्याने रोजचा साठा मिळवताना प्रशासकीय यंत्रणेची दमछाक होऊ लागली आहे.

केंद्र सरकारने ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या नागरिकांसाठी लसीकरणास परवानगी देताच मागील २८ दिवसांपासून अनेक केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडताना दिसत आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू केले जाणार असल्याने मागणी वाढेल आणि गर्दीतही भर पडेल या भीतीने ४५ वर्षांपुढील अनेकांनी लस घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस घ्यायचा असल्याने अशांचीही या गर्दीत भर पडत आहेत. असे असले तरी लशींच्या अपुऱ्या साठ्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहीमेत सातत्याने खंड पडत असल्याचे चित्र आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच ठाणे ग्रामीण भागांत शासकीय आणि खासगी असे एकूण २३२ लसीकरण केंद्रे आहेत. दररोज प्रत्येक केंद्रावर १०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. त्यानुसार, लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र लशींचा पुरेसा साठा मिळत नसल्यामुळे दिवसाआड यापैकी ५० टक्क्यांहून अधिक केंद्रे बंद ठेवण्याची वेळ येते, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी  दिवसाला १० ते १२ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण जेमतेम ४ ते ५ हजारांवर आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ४५ शासकीय तर १४ खासगी केंद्रे आहेत. या केंद्रांवर दुसऱ्या दिवशी लशींचा पुरवठा करू  शकतो अथवा नाही हे अनेकदा सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट नसते, अशी माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. ठाणे शहराला मंगळवारी सायंकाळी सहा हजार लसकुप्या मिळाल्या. मात्र हा साठा बुधवारी दुपारीच संपुष्टात आला. परिणामी केंद्रे बंद करून गुरुवारी येणाऱ्या साठ्याची प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय उरला नाही, असे महापौर म्हणाले.

अनेक केंद्रांवर जेमतेम शंभर ते दीडशे लसकुप्याच देता येत आहेत. त्या तुलनेत येथे येणाऱ्या रहिवाशांचा आकडा बराच मोठा आहे. त्यामुळे गर्दी वाढते आणि संसर्गाची भीतीही वाढते असे म्हस्के यांनी सांगितले. या परिस्थितीत बदल व्हावा आणि १ मेपासून तरी आम्हाला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लशीचा साठा नियमित आणि पुरेसा प्रमाणात उपलब्ध होताना अडचणी येत असल्यामुळे काही केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र उपलब्ध साठ्यात अधिकाधिक जणांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागांतही लसीकरण मोहिमेविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली जात आहे. १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेचे लवकरच नियोजन केले जाईल असे आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी सांगितले.

दुसऱ्या मात्रेसाठी प्रतीक्षा

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत कोवॅक्सिन लशीचे दोन लाख २४ हजार ५५२ जणांनी पहिली मात्रा घेतली आहे. त्यानंतर या लशीचा पुरवठा अचानक खालावला. आतापर्यंत या लशीचा दुसरा डोस ६१ हजार ८३६ जणांनी घेतला आहे. त्यामुळे पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांच्या संख्येतील तफावत मोठी आहे. या लशीचा साठा लवकरात लवकर यायला हवा अशी अपेक्षा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.