पोलीस ठाण्यासमोरच उपोषणाचा इशारा
अंबरनाथ नगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला तरी मुख्य सूत्रधाराला अटक झाली नसल्याने येत्या आठ दिवसांत या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला अटक न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा गुंजाळ यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. हे उपोषण अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरच करण्यात येणार असून यामागची भूमिका गुंजाळ यांच्या कुटुंबीयांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अंबरनाथमधील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांची २५ डिसेंबर २०१५ ला भर दिवसा तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येला एक महिना पूर्ण झाला असून अद्याप पोलिसांना या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश आलेले नाही. मुख्य सूत्रधाराला अटक होत नसल्याने अखेर गुंजाळ कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत आपला पोलिसी तपासाबाबतचा राग व्यक्त केला. या वेळी संपूर्ण कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. रमेश गुंजाळ यांची दिवसाढवळ्या हत्या झाली असून यामुळे गेले महिनाभर आम्ही दहशतीखाली वावरत असल्याच्या भावना गुंजाळ यांच्या आई लीलाबाई व पत्नी जया यांनी भावुक होऊन व्यक्त केल्या.
या हत्या प्रकरणात १३ संशयित आरोपींची नावे देण्यात आली असून त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चार आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर अन्य चार आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही मुख्य सूत्रधाराला अटक न झाल्याने गुंजाळ कुटुंबीयांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.