ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघ हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला असून येथे युतीसाठी मोठ्याप्रमाणात अनुकूल वातावरण आहे. यामुळे ठाण्याची जागा जिंका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील टिपटाॅप प्लाझा येथे शनिवारी शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ठाणे जिल्ह्यात १९७७ पासून ते आतापर्यंत १४ वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणूकीत पाच वेळा भाजप तर, सात वेळा शिवसेना अशी १२ वेळा शिवसेना-भाजप युती विजयी झाली आहे. या मतदार संघातील ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर पालिकेत युतीची सत्ता होती. शिवाय, याठिकाणी युतीचे आमदार आहेत. याठिकाणी युतीच्या विचारांचा मोठा मतदार आहे, असेही फडणवीस म्हणाले. ठाण्याची जागा आपण जिंकल्यात जमा आहोत. पण, ही जागा जिंकणार म्हटल्यावर कुणीही गाफिल राहू नका. राज्यातील जास्त मताधिक्याने विजयी होणाऱ्या जागांमध्ये ठाण्याच्या जागेचा समावेश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्यासाठी मिळविण्यासाठी आपण लढत आहोत, असेही ते म्हणाले. आपल्या सर्वांना गर्व असला पाहिजे की आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हे तर नव भारत निर्मितीचे सैनिक आहोत. नवभारताचे सैनिक म्हणून नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याकरता आपण काम करतोय. मोदींना निवडुण देण्याकरिता जो काम करेल तो, नवभारताचा सैनिक असणार आहे, असेही ते म्हणाले. लोकांच्या मनामध्ये मोदी आहेत. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की, लोकांच्या मनातले मोदी हे मतांच्या पेटीपर्यंत कसे पोचवायचे, असेही ते म्हणाले. २० तारखेला आराम करायचा नाही. सकाळी लवकर स्वत: कुटुंबासह मतदान करायचे, त्यानंतर मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा. शेवटच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही. यामुळे गाफिल राहू नका. जास्तीत जास्त मतांनी ठाण्याची जागा निवडणुक आली पाहिजे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>ठाण्याच्या गडासाठी दोन्ही शिवसेनेचे रोड शो, बाईक रॅली

उद्धव ठाकरेंना मिर्च्या झोंबल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना नकली शिवसेना म्हटल्यामुळे मिर्च्या झोंबल्या आहेत. पण, मोदी चुकीचे काही म्हणाले नाहीत. कारण, उद्धव ठाकरे यांचे वागणेच तसे आहे. बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करू शकते का, टिपू सुलतानचे नारे देऊ शकते का, मुख्यमंत्री असताना याकूब मेमन कबर सजविली जाऊ शकते का, स्टार प्रचारक म्हणून मुंबई बाॅम्ब स्फोटातील आरोपी प्रचार करू शकतो का, प्रचारामध्ये लांगुलचालन करण्यासाठी पाकीस्तानचे झेंडे वापरावे लागतात, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असली असल्याचे फडणवीस म्हणाले. उद्ध‌व ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झेंड्याला भगव फडक म्हणाले. कारण, त्यांना आता चांद तारावाला हिरवा झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला आहे. आता त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा ध्वज देखील फडक वाटू लागेल. कारण, अलीकडच्या काळात त्यांच्या विचारांवर इतके हिरव सावट तयार झाले आहे की, त्यांना भगव पाहवत नाही, अशी टिकाही त्यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis appeal to workers regarding winning thana seats amy
Show comments