ठाणे : महायुतीत ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्याने नाराज झालेल्या नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले असून नवी मुंबईत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना भाजप कार्यकर्त्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले. या दोन्ही शहरात नाराजीचा सुर उमटत असला तरी ठाणे शहरात मात्र महायुतीच्या नेत्यामध्ये दिलजमाईचे चित्र दिसून आले.

ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजप आमदार आणि नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगत भाजपच्या नेत्यांनी ठाण्याच्या जागेवर दावा केला होता. भाजपमधून माजी खासदार संजीव नाईक हे इच्छुक होते. तर, हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात येत असून युतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला मिळत होती. यामुळे या जागेसाठी शिंदेची शिवसेना आग्रही होती. या रस्सीखेचमध्ये अखेर शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारली आणि याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी घोषणेच्या दुसऱ्या दिवशीच भाजपमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्याबाबत नवी मुंबई आणि मिरा-भाईंदरमधील पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून त्याचबरोबर नवी मुंबईत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना भाजप कार्यकर्त्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले. या दोन्ही शहरापाठोपाठ ठाण्यातही काही पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सुर लावत राजीनामे देण्याचा इशारा दिला. पण, स्थानिक नेत्यांनी समजुत काढत त्यांची नाराजी दूर केल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा – ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिंदे गटाचे नरेश म्हस्के एकमेकांसमोर

ठाणे शहरातील भाजपच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभा निवडणूक प्रमुख, नगरसेवक, परिवहन सदस्य, सर्व मोर्चा अध्यक्ष, मोर्चा सरचिटणीस, सेल प्रकोष्ठचे संयोजक, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस, प्रभाग अध्यक्ष, सुपर वॉरियर्स असे १५० पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याच्या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली होती. नरेश म्हस्के यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरुन अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देत काम करणार नसल्याचा इशारा दिला. अखेर दिड तासाच्या चर्चेनंतर नाराजी दूर करण्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांना यश आले. या बैठकीनंतर नरेश म्हस्के यांनी भाजप कार्यालयात उपस्थिती लावून पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यामुळे नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या दोन्ही शहरात नाराजीचा सुर उमटत असला तरी ठाणे शहरात मात्र महायुतीच्या नेत्यामध्ये दिलजमाईचे चित्र दिसून आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर गणेश नाईक यांचा आर्शीवाद घेण्यासाठी गेलो होतो. त्याठिकाणी संदीप नाईक, सागर नाईक हे भेटले. मी विद्यार्थी सेनेचे काम करीत असताना गणेश नाईक यांचा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यांनी नेहमीच माझे कौतुक केले. त्यांनी आर्शीवाद देऊन काही चिंता करु नकोस, नवी मुंबईतून जास्तीत जास्तीत मताधिक्य मिळेल. सर्व काही मी पाहीन, काही अडचण असेल तर सांग, असे मला सांगितले. – नरेश म्हस्के, ठाण्यातील महायुतीचे उमेदवार

हेही वाचा – डोंबिवलीत शक्तिप्रदर्शन करत श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी मुंबईत काय घडले याबद्दल मला माहिती नाही. नरेश म्हस्के हेच महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे इतर कोणताही विचार करण्याची गरज नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तीव्र भावना बैठकीत व्यक्त करत राजीनामे दिले होते. या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची समजूत काढली आणि त्यांनी राजीनामे मागे घेतले. जिल्हा कार्यकरणी त्याचे काम करीत असून सर्वजण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. – संजय केळकर, आमदार, भाजप