डोंबिवलीतील संतप्त प्रवाशांचा इशारा; दोन दिवसांची मुदत
डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्ता, जोंधळे हायस्कूलकडे जाणाऱ्या छताच्या स्कायवॉकचे काम पूर्ण झाले आहे. मात्र राजकीय दबावतंत्रामुळे हा स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येत नाही. स्कायवॉक खुला होत नसल्याने पादचाऱ्यांना नाहक वळसे घेऊन, गर्दीतून रिक्षा वाहनतळावर जावे लागते. त्यामुळे छताचा स्कायवॉक दोन दिवसात खुला करा, अन्यथा प्रवासी स्वत:हून पुढाकार घेऊन हा स्कायवॉक खुला करतील, असे खुले आव्हान प्रवाशांनी पालिकेला दिले आहे.
छताचा स्कायवॉकची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. मागील तीन महिने छताच्या कामासाठी बंद असलेला हा नवाकोरा स्कायवॉक प्रवाशांना खुला करावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. परंतु, काही राजकीय मंडळी छताच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी छताच्या स्कायवॉकच्या ठिकाणी ‘करुन दाखविले’चा सोहळा करण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे स्कायवॉक खुला होत नसल्याची माहिती प्रवाशांना मिळाली आहे.
मध्य रेल्वेतर्फे या भागात पादचारी पूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा पादचारी पूल तब्बल एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम भागात मुंबईच्या दिशेने रेल्वे स्थानकातून बाहेर पडणार व स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची दररोज घुसमट होणार आहे. त्यात रेल्वे स्थानकाबाहेर आल्यावर दिनदयाळ चौकात पादचारी, रिक्षा यांची अभूतपूर्व कोंडी असते. या कोंडीपासून पादचाऱ्यांना मुक्त करण्यासाठी छताचा स्कायवॉक लवकर सुरु करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मध्य रेल्वेने पश्चिमेकडील पुराणिक व्हिजन सेंटरसमोरील रेल्वेचे प्रवेशद्वार खुले करण्याची मागणीही होत आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी स्कायवॉक बांधण्यात येतात. दोन महिने सुरु असलेल्या छताच्या स्कायवॉकचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तो आता प्रवाशांसाठी खुला करावा. कोणाला या कामाचे राजकीय श्रेय घ्यायचे असेल त्यांनी ते त्यांच्या पध्दतीने घ्यावे. यासाठी स्कायवॉक आणि प्रवाशांना वेठीस धरण्यात येऊ नये.
– मनीषा सोमण, रेल्वे प्रवासी

येत्या दोन दिवसात छताचा स्कायवॉक खुले करण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले आहे. ते पाळण्यात आले नाहीतर प्रवासीच हा स्कायवॉक येजा करण्यासाठी खुला करतील. यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊ.
– प्रशांत रेडिज, रेल्वे प्रवासी