कल्याण – डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनी स्फोटात गुरुवारी रात्री झालेल्या स्फोटातील मृतांच्या आकडेवारीवरून पालिका आणि पोलीस प्रशासनात गोंधळ असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. या स्फोटात गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आठ कामगार मृत झाल्याचे स्पष्ट केले होते. शुक्रवारी सकाळी हा आकडा ११ तर पोलिसांचा हवाला घेऊन काही माध्यमांनी हा आकडा १३ असल्याचे जाहीर करून खळबळ उडवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> दीड लाख रुपयांसाठी तीन महिन्यांच्या बाळाच्या विक्रीचा आईकडून प्रयत्न – बाळाच्या आईसह नऊ दलाल अटकेत

गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आणखी तीन मृतदेह कंपनी आवारात सापडले आहेत. ते तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात येणार आहेत अशी ऐकीव माहिती घटनास्थळावरील वरिष्ठ नियंत्रक अधिकाऱ्यांना मिळाली. ती माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी जाहीर केली. त्यामुळे मृतांचा आकडा आठ असल्याचे सांंगण्यात आले.

हेही वाचा >>> Dombivli MIDC Blast: बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांची पालिका रुग्णालय, कंपनी परिसरात शोधाशोध

शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी आवार, परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले विविध अवशेष पाच बोजक्यांमध्ये भरून पालिका शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. अवशेषांनी भरलेली ही पाच बोजकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांचा आकडा १३ असल्याचे जाहीर केले. या पाच बोजक्यांमध्ये दोन कामगारांचे अवशेष असण्याची शक्यता वैद्यकीय पथकाकडून वर्तविण्यात आली. परंतु, ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच अवशेषांची ही बोजकी म्हणजे पाच मृत कामगार असा अर्थ काढून प्रसिध्दीपत्रक जाहीर केले. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी मृतांच्या आकडेवरून गोधळ उडाला. पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी शुक्रवारी सकाळी शास्त्रीनगर रुग्णालयात भेट दिल्यानंतर तेथे आठ मृतदेह होते. त्याप्रमाणे पालिकेने आठ मृतदेह स्फोटातून बाहेर काढल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी सकाळी सापडलेल्या विविध अवशेषांची फोरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर ते अवेशष किती कामगारांचे आहेत, ते स्पष्ट होईल, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli blast update confusion over dombivli blast death toll zws