डोंबिवली – अमुदान कंपनीतील आग, तेथील धूर आणि रसायनांच्या स्फोटामुळे वाढलेले तापमान नियंत्रित करण्यात अग्निशमन, आपत्कालीन विभागाच्या पथकांना शुक्रवारी यश आले. कंपनी जागेवरील बचाव कार्य थांबवले गेले असले तरी काही कामगारांचा अद्याप शोध लागत नसल्याने त्यांचे नातेवाईक रुग्णालय, कंपनी परिसरात तळ ठोकून आहेत.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एकूण आठ मृतदेह आहेत. यामधील दोन जणांची ओळख पटविण्यात आली आहे. सर्व मृतदेह जळून खाक झाले असल्याचे त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांसह, नातेवाईकांनाही अवघड जात आहे. डीएनए चाचणीतून या मृतदेहांची ओळख पटविणे शक्य होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. एका मृत महिलेची ओळख तिच्या हातामधील अंगठीमुळे पटविण्यात आली.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील जळीत अमुदान कंपनीच्या मालक, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

बचाव कार्य थांंबविले गेले असल्याने अद्याप बेपत्ता असलेल्या कामगारांचा शोध घेणे तपास यंत्रणावरील जोखमीचे काम आहे. अनेक कामगार परप्रांतीय असल्याने त्यांचे उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड भागातील नातेवाईक डोंबिवलीत दाखल झाले आहेत. शोकाकूल झालेले हे नातेवाईक आपल्या परिवारातील सदस्य असलेल्या कामगाराचा रुग्णालय, कंपनी परिसरात शोध घेत आहेत. पालिका रुग्णालयात दाखल जखमी रूग्ण, मृतांची माहिती या नातेवाईकांंना दिली जात आहे. यामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव नसल्याने कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता आहे.

हेही वाचा >>> अंगठीवरून समजली अमुदान कंपनी स्फोटातील महिला कर्मचाऱ्याच्या मृतदेहाची ओळख

कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी कामगारांच्या नातेवाईकांना योग्य ती माहिती देणे, मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न नातेवाईकांच्या माध्यमातून केला जात आहे. आपला सहकारी अद्याप आढळून येत नसल्याने काही कामगारांंमध्ये अस्वस्थता आहे. जखमींवर एम्स, शिवम, नेपच्युन, ममता, गजानन येथे उपचार सुरू आहेत.

या बचावकार्यात राष्ट्रीय आपत्ती, राज्य आपत्ती विभाग, जिल्हा आपत्ती विभाग, कल्याण डोंबिवली पालिका, ठाणे, आणि एमआयडीसी, पलावा आणि ठाणे जिल्ह्यातील इतर अग्निशमन दलांचे जवान सहभागी झाले होते.